मुंबई: कोरोना (Corona) व ओमायक्रॉनची वाढती रूग्णसंख्या (Omicron Patients) लक्षात घेता १५ ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray On Vaccination) यांनी केले. कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम आज मुंबईत सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण नऊ लसीकरण केंद्र निर्देशित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर, महानगरपालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रात दुरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
[read_also content=”मुंबई वगळता राज्यातील शाळा सुरुच राहणार, गरजेनुसार स्थानिक पातळीवर होणार निर्णय, मार्गदर्शक सूचनांच्या काटेकोर पालनाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/education-minister-varsha-gaikwad-on-schools-closing-nrsr-217827.html”]
याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर,आ. झिशान सिद्दिकी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्षा प्रज्ञा भुतकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, अतिरिक्त पालिका आयुकत सुरेश काकाणी, उपआयुक्त पराग मसुरकर, संजय कुर्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, बीकेसी जम्बो कोविड समर्पित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश डेरे हे मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा टप्पा आजपासून सुरु होत आहे,ही आनंदाची बाब आहे. कोविड काळात केलेल्या कामाबद्दल धारावी मॉडेल व महानगरपालिकेचे कौतुक संपूर्ण जगभरात झाले आहे. शासन, प्रशासन म्हणून आपण नेहमी काम करीत असतो. कोविड रुग्णांची आजची वाढती संख्या लक्षात घेतली तर ती साडेआठ हजाराच्या घरात गेली आहे. वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेळेत होणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपला सेकंड डोससुद्धा निर्धारित वेळेत घ्यावा,असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कोविडच्या केसेस वाढत असताना प्रत्येकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेने लसीकरणाची संपूर्ण तयारी केली असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महानगरपालिकेने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील नऊ लसीकरण केंद्रांवर योग्य ती व्यवस्था केली आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या संमती पत्रानंतरच आपण लसीकरण करीत आहोत. लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवल्यास नजीकच्या केंद्रात संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी केले.