
झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित
मुंबई : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील १७ खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली असून, त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झाच्या तीन आउटलेट्सचा समावेश आहे. परळ, मरोळ-अंधेरी पूर्व आणि बोरिवली पश्चिम येथील डॉमिनोजच्या आउटलेट्सवर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीतील त्रुटी, अस्वच्छ परिसर तसेच आवश्यक कागदपत्रे आणि नियमांचे पालन न केल्याचे FDAच्या कारवाईत समोर आले.
FDAच्या कारवाईत डॉमिनोजच्या तीन आउटलेट्सचा समावेश आहे.
FDAच्या तपासणी आणि पुनर्तपासणीत विविध खाद्य आस्थापनांमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळला, तर काही ठिकाणी उंदरांनी अन्नाची पाकिटे कुरतडल्याचे निदर्शनास आले. काही आस्थापनांमध्ये खराब अन्नपदार्थ, जळलेले किंवा अति वापरलेले तेल वापरले जात असल्याचेही आढळले. कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य पद्धतीने वेगळे न ठेवणे तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या साठवणुकीत आवश्यक काळजी न घेतल्याचे FDAने नमूद केले आहे.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छ फरशी, अन्न हाताळण्याच्या ठिकाणी साचलेले पाणी, उघड्या कचरापेट्या आणि अस्वच्छ फ्रिज आढळले. काही आस्थापनांमध्ये फ्रिजचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक नोंदी आणि उपकरणांशी संबंधित देखभाल नोंदीही उपलब्ध नसल्याचे आढळले. अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक अप्रॉन, हेडगियर आणि इतर संरक्षणात्मक साधने नसल्याचेही तपासणीत समोर आले.
FDAने केवळ स्वच्छतेपुरती कारवाई न करता अन्नसुरक्षा नियमांच्या पालनाचीही तपासणी केली. काही आस्थापनांनी FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला नव्हता. तसेच पेस्ट कंट्रोल अहवाल, अन्न हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, खरेदी बिले आणि इतर आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. काही ठिकाणी यापूर्वी FDAने दिलेल्या सुधारणा नोटिसीचे पालन करण्यात आले नसल्याचेही आढळले. त्यामुळे पुनर्तपासणीनंतर कठोर कारवाई करण्यात आली.
परळ येथील डॉमिनोजच्या आउटलेटची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती. सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी दूर न केल्याने पुढील कारवाई करण्यात आली. पुनर्तपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले आढळले. तसेच चिकन आणि पनीर तयार करण्यासाठी एकाच ओव्हन किंवा ग्रिलचा वापर होत असल्याचे FDAने नमूद केले.
मुंबईतील कारवाईबरोबरच FDAने राज्यातील विविध भागांतही अन्नसुरक्षेविरोधातील कारवाया केल्या. या कारवायांमध्ये २४,४०६ किलो संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ५०.१९ लाख रुपये असल्याचे FDAने सांगितले.
Ans: मुंबईतील डॉमिनोजच्या तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.
Ans: मुंबईत एकूण किती आस्थापनांवर कारवाई झाली?
Ans: FDAनुसार राज्यातील विविध कारवायांमध्ये २४,४०६ किलो संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला.