मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार, याबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही हालचालींना वेग आला आहे. वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगच अंतिम निर्णय घेणार आहे.कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विशेष म्हणजे उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होऊ शकते असेही सांगितले जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते.
हेही वाचा: ‘भाजपने केला जनतेचा विश्वासघात’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांसह इतर छोट्या-मोठ्या पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बैठका,सभा, दौरे, मेळाव्यांना वेग आला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या उमेदवारांचीही लवकरच घोषणा होऊ शकते. भाजपची केंद्रीय नेतृत्त्वासोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही आज पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहे.या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा: दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने, नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ