देवेंद्र फडणवीस आणि रामदास कदम (फोटो-ट्विटर)
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. चमकोगिरी करणारे आणि कुचकामी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा घ्यायला हवा, असे रामदास कदम म्हणाले होते. भाजपला राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. आमचे आम्ही लढू, तुमचे तुम्ही लढा. आता कदमांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आम्हीही माणसे आहोत, आमची मने दुखावतात, याबबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. गेल्या १४ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होतो तर, मुंबई गोवा महामार्ग का होत नाही? रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची एलर्जी आहे. चव्हाण कुचकामी मंत्री आहेत. भाजपला राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. आमचे आम्ही लढू, तुमचे तुम्ही लढा.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
युतीमध्ये एकत्रितपणे काम करत असताना या प्रकारचे आरोप करणे कोणत्या धर्मामध्ये बसते? रामदास कदमांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते अंतर्गत मांडले पाहिजे. दरवेळेस भाजपला, भाजपच्या नेत्यांना वेठीस धरल्याने चांगली भावना तयार होत नाही. तरी रामदास कदमांचे म्हणणे काय आहे ते मी ऐकून घेईन आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. रामदास कदम वारंवार टोकाचे बोलतात. यामुळे आमची मने देखील दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसे आहोत. त्यांच्या उत्तरावर ५० गोष्टी आम्हाला देखील बोलता येतील. मोठ्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळले पाहिजे. वारंवार भाजपला असे बोलणे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन,.