
नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे अनावरण
१४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प
मुंबई: म्हाडा मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे (Master Plan) अनावरण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प C & D A म्हणजेच बांधकाम व विकास संस्थेतर्फे अदाणी समूहामार्फत साकारण्यात येत असून, देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरतो. सदर प्रकल्प मुंबईच्या नियोजनबद्ध, आधुनिक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
गोरेगाव (पश्चिम) येथील गणेश मैदान येथे मोतीलाल नगर १, २ व ३ या वसाहतींच्या पुनर्विकासाचा समग्र बृहत आराखडा आज स्थानिक रहिवाशांपुढे सादर करण्यात आला. या प्रसंगी बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले की, “मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या आजवरच्या वाटचालीतील अतिशय महत्वपूर्ण व ऐतिहासिक प्रकल्प आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुसज्ज आणि सुनियोजित हक्काचा निवारा देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून या प्रकल्पाला गती व दिशा मिळाली आहे.”
या प्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रशस्त, सुसज्ज घरे आणि अत्याधुनिक, सर्व सोयी-सुविधांयुक्त आदर्श वसाहतीची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत असून, रहिवाशांना एक नवी, सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली प्रदान करण्याचा म्हाडाने प्रयत्न केला असल्याचेही श्री. जयस्वाल यांनी नमूद केले. सुमारे दोन दशकांपासून प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प म्हणजे मुंबईच्या शहरीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा साक्षीदार ठरणार आहे. १९६० च्या दशकामध्ये उभारण्यात आलेली गोरेगाव परिसरातील ही वसाहत, त्या काळातील मध्यमवर्गीय गरजांना पूरक ठरली होती. कालांतराने वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि पायाभूत सुविधांवरील ताण यामुळे या वसाहतीच्या पुनर्विकासाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करिता राज्य शासनाने विशेष प्रकल्प प्राधिकरणाचा दर्जा दिला असून प्रकल्पाची बांधकाम व विकास संस्था (C &DA) म्हणून काटेकोर निविदा प्रक्रियेतून अदाणी समूहाची निवड झाली आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सात वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट म्हाडाने ठेवले आहे.
या प्रकल्पांतर्गत ३७०२ पात्र रहिवाशांना प्रत्येकी तब्बल १६०० चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामुल्य देण्यात येणार आहे. शिवाय, ३२८ पात्र व्यावसायिकांना ९८७ चौ. फूट क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत. सुमारे १६०० झोपडपट्टी धारकांना एसआरए कायद्यान्वये ३०० चौ. फूट क्षेत्राची घरे देण्याचे नियोजन या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहेत. तसेच, या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाला देखील मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही वसाहत “१५ मिनिटांचे शहर (15 Minutes City)” म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणार आहे. या वसाहतीतील विविध सुविधा जसे शाळा, दवाखाने , हॉस्पिटल बाजार पेठ, व्यावसायिक संकुल, हिरवळीने नटलेली उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विश्रांती क्षेत्रे, खेळाचे मैदाने, जॉगिंग पार्क, सायकल ट्रॅक, सांस्कृतिक सभागृह, जिमखाना सारख्या सुविधा प्रकल्पाच्या १५ मिनिटांच्या अंतरावर नागरिकांना उपलब्ध होतील . त्याचबरोबर मुंबईमध्ये मोकळ्या जागांची कमतरता असतानाच या प्रकल्पामध्ये सुमारे १५ एकर जागेवर हरित पट्ट्याचे नियोजन करण्यात आले आहे . याशिवाय, प्रकल्पामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा जसे की बहुमजली पार्किंग व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP),पावसाच्या पाण्याचे संधारण (Rainwater Harvesting), सौरऊर्जेचा वापर, स्मार्ट सुरक्षा यंत्रणा (CCTV, Access Control), अग्निसुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. अशाप्रकारे हा प्रकल्प हा प्रकल्प केवळ निवासापुरता मर्यादित न राहता ‘लाईव्ह, वर्क अँड प्ले’ या संकल्पनेवर आधारित एक संपूर्ण जीवनशैली प्रदान करणारा ठरणार आहे.
सखल भागात वसलेल्या या वसाहतीने वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पांतर्गत प्रशस्त अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था अशा अनेक बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुखकर होणार आहे.वसाहतींच्या कमी घनतेच्या लेआऊटचा लाभ घेत म्हाडाने पुनर्वसन घटकांना देऊ केलेले १६०० चौ. फुटांचे घर हे या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य ठरले असून मुंबईतील आजवरच्या कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पात एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाचे घर रहिवाशांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही बाब मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. अशाप्रकारे सहा दशकांनंतर पुन्हा एकदा हा प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील शहरी नियोजनाचा एक आदर्श ठरणार आहे.
Nashik News : म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक
जुन्या वसाहतीचे रूपांतर आधुनिक आणि शाश्वत शहररचनेत करण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे रहिवाशांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे. तसेच, अशा प्रकारच्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे मुंबईच्या समतोल आणि नियोजित विकासाला गती मिळणार आहे.
१६०० चौ. फुटांच्या प्रशस्त सदनिका आणि सोबतच एका नव्या अत्याधुनिक टाऊनशिपमधील जीवनशैली या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना प्रदान करण्यात येत आहे. यावेळी ‘म्हाडा’ने सादर केलेल्या समग्र विकास आराखड्यात या सर्व बाबी तपशीलवार उलगडून सांगण्यात आल्या. तसेच, रहिवाशांच्या हितासाठी म्हाडा कटिबद्ध असून प्रकल्पाची निर्धारित कालावधीत पूर्तता करण्याचीही ग्वाही म्हाडाने यावेळी रहिवाशांना दिली