मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
प्राथमिक माहितीनुसार, आग लागल्याची माहिती दुपारी 1.54 वाजता मुंबई अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. मुलुंडमधील पीएपी इमारत प्रकल्पाच्या ठिकाणी अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेच्या सुमारास परिसरातील काही रहिवाशांना स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला.
या घटनेची व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून याग आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य परिसरात पसरल्याचे दिसत आहे. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, आग लागण्यापूर्वी जोरदार स्फोटाचा आवाज झाला होता. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.
मलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी परिसरात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पीएपी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अशा बांधकामस्थळी आग लागल्याने कामगारांची सुरक्षा, अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि बांधकाम साहित्याच्या साठवणुकीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
आग नेमकी कोणत्या भागात लागली, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे आग पसरली का आणि घटनास्थळी किती कामगार उपस्थित होते, याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे शॉर्ट सर्किट आणि इतर कारणांमुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे घरातील तसेच कार्यालयातील विद्युत यंत्रणेवर (Electrical Systems) अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होते. दीर्घकाळ कोरडे हवामान आणि वाढत्या तापमानामुळे जंगलांमध्ये व मोकळ्या जागेवर आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.






