मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये (Mumbai Bank) मजूर म्हणून नोंद असलेले आणि आता मुंबई बँकेचे संचालक म्हणून काम पाहत असलेले भाजपचे आमदार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई सहकारी बँकेमध्ये २००० कोटींचा घोटाळा केलेला आहे. त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद त्वरित काढून घ्यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap Demands Resignation Of Pravin Darekar) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे.
बोगस मजूर दरेकर यांची ज्या ‘प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे’त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे ‘रंगारी’ मजूर असल्याचे दिसते. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंदणी असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षांत प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुराची कामे केली व यासाठी त्यांना किती मजुरी मिळाली याचा लेखाजोखा मांडावा,अशी मागणी केली.
[read_also content=”पाथर्डीत आढळले स्त्री जातीचे बेवारस अर्भक; परिसरात खळबळ https://www.navarashtra.com/latest-news/khandesh/ahmednagar/unaccompanied-infants-of-female-caste-were-found-in-pathardi-nrka-257950.html”]
मुंबई सहकारी बँकेमध्ये २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीमध्ये २००० कोटींचा घोटाळा होत असताना त्यावेळेस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांना पाठीशी घातले आहे. या काळात या विषयावर अनेक तक्रारी झाल्या. सभागृहात अनेक वेळा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु फडणवीस यांनी दरेकर यांना क्लीनचिट दिली. हा खूप मोठा घोटाळा आहे. फडणवीस यांनी या संपूर्ण घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा. तसेच दरेकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जगताप यांनी शेवटी केली.