
Mumbai Local Trains
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मुंबई रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी येथे पाच नवीन फलाट आणि दोन पिट लाइन, दादर येथे एक अतिरिक्त फलाट, तर वसई रोड परिसरात सहा फलाट, तीन पिट लाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन फलाट आणि दोन पिट लाइन विकसित करण्यात येणार आहेत. अनेक फलाटांचा विस्तार करून ते १५ डब्यांच्या गाड्यांसाठी सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा ३५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गरज भासल्यास आणखी २० विशेष गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्यास रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नमूद केले.
लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने २३८ वातानुकूलित लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. या निर्मिती प्रक्रियेत मॉडर्न कोच फॅक्टरी आणि रेल कोच फॅक्टरी यांचा समन्वय राहणार आहे. नवीन वातानुकूलित लोकलची पहिली गाडी २०२७ मध्ये उपलब्ध होईल, तर २०३० पर्यंत सर्व २३८ रेकची निर्मिती आणि पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गालगत रेल्वेमार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार समृद्धी महामार्गालगत पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गांचे आरेखन करण्यात येणार आहे. या नवीन रेल्वेमार्गांमुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. मालवाहतूक आणि प्रवासी सेवांची क्षमता वाढल्याने राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे ४५५ किलोमीटरचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामासाठी विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशभरात पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहनही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केले.
‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन