
All India Rajbhasha Sammelan Vashi, Amit Shah Navi Mumbai Visit
All India Rajbhasha Sammelan in Mumbai: राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्याच्या निर्णयानंतर अनेक रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकण्यास सुरुवातही केली.पण आता या मराठी-हिंदी वादाला नवे वळण मिळाले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयात बदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत मराठी शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत एक वर्षाची मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद ताजा असतानाच आता यात आणखी एका वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
Shivsena Supreme Court Hearing: पक्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच बंडखोरी! शिंदेंच्या वकिलांचा उद्धव
या संमेलनासाठी देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, विविध संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात, असेही बोलले जात आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. देशभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी येण्याची शक्यता असल्याने १० हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे.
याच काळात गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाची लगबग सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मराठी-अमराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना वाशीत होणाऱ्या हिंदी राजभाषा संमेलनामुळे आणखी एका वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ आणि त्याला मनसेचा विरोध या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वेशीवर होणाऱ्या केंद्राच्या हिंदी कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे येत्या काळात मराठी भाषा, रिक्षा-टॅक्सी परवाने आणि हिंदी राजभाषा संमेलन या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.