फोटो सौजन्य- Air Pollution
भारताची आर्थिक राजधानी मुंबईला मोठ्या वायू प्रदूषण संकटाचा सामना करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा अधिक खालावल्याची नोंद झाली आहे. दिवाळीपासून पीएएम२.५ पातळ्यांमध्ये ५०.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे फक्त आताच निदर्शनास आलेले नाही, तर संशोधनांमधून देखील निदर्शनास आले आहे की मुंबईतील पीएम२.५ वायू प्रदूषणामुळे जानेवारी २०२१ पासून जवळपास १४,००० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे फक्त २०२४ मध्ये शहराच्या अर्थव्यवस्थेवर २.१ बिलियन यूएस डॉलर्सच्या खर्चाचा भार पडला. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईतील वायू प्रदूषण पातळ्यांमध्ये धक्कादायक ३०५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तसेच २०१९ ते २०२३ दरम्यान हवेचा दर्जा २२ टक्क्यांनी खालावला आहे.
अकाली मृत्यू, श्वसनाच्या आजारात वाढ
नुकतेच वायू प्रदूषणामध्ये वाढ झाल्यामुळे विशेषत: वायू प्रदूषणाबाबत एलर्जी असलेल्या व्यक्तींमध्ये श्वसनसंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील आघाडीच्या पेडिएट्रिक हॉस्पिटलमध्ये फक्त एका महिन्यात श्वसनसंबंधित आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या मुलांच्या आकडेवारीत ३० टक्क्यांची वाढ झाली. तसेच, सकाळी ९ पर्यंत असणारे धूळीचे वातावरण आता विशिष्ट दिवशी सकाळी ११ पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक वेळ असते.”वायू प्रदूषणाच्या उच्च पातळ्या, विशेषत: पीएम२.५ भारतातील लाखो व्यक्तींच्या अकाली मृत्यूस कारणीभूत आहे, तसेच आयुष्य कमी होण्यासोबत व्यक्तींमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे,” असे सस्टेनेबिलिटी फ्यूचर्स कोलॅबारेटिव्ह येथील सीनियर रिसर्च असोसिएट अनन्या महाजन म्हणाल्या. ”वृद्धांना हृदय व फुफ्फुस संबंधित आजार, मुलांना श्वसनविषयक आजार अशा स्वरूपात आरोग्यावर होणारे परिणाम दिसून येत आहे, तसेच कोमोर्बिडीटीज असलेल्या व्यक्तींची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबईने दिल्लीमधील वायू प्रदूषण संकटामधून शिकले पाहिजे
या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित कार्यवाही आवश्यक आहे. सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर)चे संस्थापक डॉ. गुफरान बैग यांनी चेतावणी दिली आहे की ” मुंबईने दिल्लीमधील वायू प्रदूषण संकटामधून शिकले पाहिजे. घातक वायू प्रदूषकांपासून निवासींचे संरक्षण करण्यासाठी आपण सक्रियपणे कार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले. डॉ. बैग यांनी नुकतेच केलेल्या संशोधनामधून निदर्शनास येते की मुंबईतील पीएम२.५ कण इतर एसएएफएआर शहरांमधील कणांच्या तुलनेत अधिक विषारी आहेत, ज्यामधून शुद्ध तंत्रज्ञानांचा अवलंब करण्याची आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्सर्जन कमी करण्याची त्वरित गरज दिसून येते.
वायू प्रदूषणाचे निराकरण करण्यासाठी सरकारी उपक्रम
मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (एमसीएपी)चा निव्वळ-शून्य आणि अनुकूल हवामानयुक्त मुंबई घडवण्याचा मनसुबा आहे. तसेच, हवामान बदलाच्या परिणामांचे निराकरण करण्यासाठी आणि शहरी स्थिरता वाढवण्यासाठी परिवर्तनात्मक हवामान सोल्यूशन्स व समन्वित प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. पॅरिस अॅग्रीमेंटशी बांधील राहत मुंबईचे २०३० पर्यंत ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनांमध्ये ५० टक्के घट करण्याचे लक्ष्य आहे आणि २०५० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्न करत आहे. तसेच, मुंबई ग्रीन योद्धा प्रोग्रामचा कार्बन डायऑक्साईड शोषून घेत हवेचा दर्जा सुधारण्यासाठी स्थानिक वनस्पती प्रजातींचा उपयोग करून शहरातील हरित आच्छादन वाढवण्याचा मनसुबा आहे.
इलेक्ट्रिक वेईकल अवलंबतेला चालना देणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्रात जवळपास ३,०७९ चार्जिंग पॉइण्ट्स स्थापित करण्यात आले आहेत. टाटा पॉवरची महाराष्ट्रात अतिरिक्त ४,००० चार्जिंग स्टेशन्ससह आपले ग्रीन एनर्जी फूटप्रिंट वाढवण्याची योजना आहे, या स्टेशन्सना पूर्णत: नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधून ऊर्जा मिळेल.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याण संस्थांना अर्ज केल्याच्या सात दिवसांच्या आत ईव्ही चार्जिंग पॉइण्ट्स स्थापित करण्यासाठी एनओसी मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रिक सार्वजनिक परिवहनाला चालना
महाराष्ट्र ईव्ही पॉलिसीने ईव्हींप्रती मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक बसेस आणि इतर पर्यावरणपूरक परिवहन पर्यायांची अंमलबजावणी शक्य झाली आहे.मुंबईतील वायू प्रदूषण संकट परिवर्तनात्मक बदलासाठी महत्त्वाचा भाग आहे. नाविन्यतेचा अवलंब करत आणि समुदायाशी संलग्न होत शहर शाश्वत भविष्य घडवू शकते, आरोग्यसंबंधित जोखीम दूर करू शकते आणि आर्थिक विकासाला गती देऊ शकते. इलेक्ट्रिक वेईकल पायाभूत सुविधा व हरित तंत्रज्ञानांमध्ये वाढ करण्यासाठी सार्वजनिक, सरकारी व खाजगी क्षेत्रांमधील सहयोगात्मक प्रयत्न या उपक्रमांना अधिक दृढ करतील आणि शहरामध्ये शुद्ध, आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्याला चालना देतील.