"हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग", देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
मुंबई : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक मार्टिन क्रुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदलाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे ही परिस्थिती वारंवार दिसत आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी यांच्यावर होत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कापणी केलेली पिके नष्ट होतात, ज्याचा मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली असून स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. महाराष्ट्रही या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा क्षमता उभारण्यात आली असून 2030 पर्यंत हरित ऊर्जेचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्वच्छ हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, जैवइंधन आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हवामान कृतीकडे केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक, नवकल्पना आणि रोजगारनिर्मितीची मोठी संधी मानतो. जागतिक भांडवल शाश्वत बाजारपेठांकडे वळत असून कमी कार्बन तंत्रज्ञानामुळे स्वच्छ उपाय अधिक परवडणारे होत आहेत. जे राज्य वेगाने बदल स्वीकारतील, ते भांडवल आणि कौशल्य आकर्षित करतील. महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करेल.
राज्यात औद्योगिक क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देणे, सार्वजनिक वाहतूक व लॉजिस्टिक प्रणाली अधिक पर्यावरणपूरक करणे यावर भर दिला जात आहे. पूरनियंत्रण व्यवस्था, हवामान स्मार्ट नागरी नियोजन आणि डेटा आधारित अंदाज प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सुरुवातीपासूनच शाश्वतता आणि आपत्ती प्रतिकारक्षमता यांचा समावेश केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवामान कृती ग्रामीण भागातही तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बदलत्या पावसाच्या पद्धती, पाण्याचा ताण आणि किनारी भागातील धोके लक्षात घेऊन हवामान प्रतिरोधक शेती, कार्यक्षम जलव्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित ग्रामीण मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर दिला जात आहे. हा बदल पुढील पिढ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करेल.
हवामान बदलासाठी आवश्यक असलेली मोठी गुंतवणूक केवळ सार्वजनिक निधीतून शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आणि खासगी क्षेत्राला सहकार्याचे आवाहन केले. मिश्र वित्त, जोखीम-वाटप आणि नवतंत्रज्ञानासाठी भांडवल यांची गरज अधोरेखित करत मुंबई जागतिक हवामान वित्तासाठी प्रभावी केंद्र बनू शकते. हवामान न्याय ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची असून विकसनशील देशांना विकास आणि पर्यावरण यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडता कामा नये. योग्य भागीदारीतून दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हवामान कृती ही घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ऊर्जा निर्मिती, प्रदूषण नियंत्रण, शहरांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना मदत या सर्व बाबतीत ठोस कामगिरी आवश्यक आहे. मुंबई क्लायमेट वीक हा चर्चेचा मंच न राहता कृतीचा मंच ठरावा, गुंतवणूकयोग्य प्रकल्प आणि अंमलात येणाऱ्या भागीदाऱ्या निर्माण व्हाव्यात. हवामान कृती ही आपल्या पिढीची मोठी आर्थिक संधी ठरू शकते.






