मुंबई : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या असाधारण कामगिरीबद्दल क्विम्प्रो २०२१ (QIMPRO 2021 Award) पुरस्काराने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांचा सन्मान झाला आहे.
मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्याच्या ‘मुंबई मॉडेल’ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनामध्ये आदर्श उदाहरण निर्माण केल्याबद्दल पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘क्विम्प्रो २०२१’ हा पुरस्कार व पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.
आरोग्य व शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी कार्यरत क्विम्प्रो फाऊंडेशनद्वारे हा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तिपत्र चहल यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपान देशाला सावरण्यासाठी गुणवत्ता सुधारणा आणि गुणवत्ता व्यवस्थापन याअनुषंगाने मार्गदर्शन करणारे आणि ‘क्वालिटी गुरु’ म्हणून जगभरात नावाजलेले डॉ. जे. एम. जुरान यांनी भारतातही गुणवत्तेवर भर देणारी राष्ट्रीय संस्कृती निर्माण व्हावी म्हणून क्विम्प्रो फाऊंडेशनच्या स्थापनेला बळ दिले.
तसेच आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, या क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यासाठी क्विम्प्रो पुरस्कार सुरु करण्याची संकल्पनाही त्यांनी दिली. त्यानुसार या फाऊंडेशनच्या वतीने सन १९८९ पासून आतापर्यंत फक्त चार वेळा पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासाठी अत्यंत असाधारण कामगिरी हा निकष प्रामुख्याने लक्षात घेतला जात असल्याची माहिती पालिकेने दिली.