
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबईत पहिल्यांदाच भाजप-शिवसेनेची सत्ता
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी घेतली पत्रकार परिषद
काल राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी जवळपास 25 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता भाजपने उलथवून लावली आहे. मुंबईत आता महायुतीचा महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक निवडणूक जणू काही त्यांच्या जीवणमरणाचा प्रश्न असल्यासारखा साम, दाम, दंड, भेद वापरुन लढल्या गेल्या. शिवसैनिकांना अटक झाली, पक्षांची लालूच दाखवली गेली, तडीपार केले गेले. ठाण्यात देखील उमेदवारांना पैशांची आमिष देण्यात आले. जबरदस्ती उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला गेला.”
“मुंबईत यांचा महापौर व्हावा अशी इच्छा होती. तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलो नाही. मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकेच्या प्रचारासाठी प्रचार केला. सर्व ठिकाणी मी प्रचाराला जाऊ शकलो नाही. सत्ताधारी पक्षांकडून अगदी घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढवली गेली. ज्यांनी निर्भयपणे मतदान केले त्यांचे आभार मानतो, ” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“जे काही यश शिवशक्तीने मिळवले आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे हे नक्कीच. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी त्यांनी एकही प्रयत्न सोडला नाही. यांच्या सभेला गर्दी फुलली होती. मात्र दुसऱ्या दिवशी खुर्च्यांची गर्दी होती. मात्र खुर्च्या कशा मतदान करून शकतात? हे न उलगडणारे कोडे आहे. भाजपने कागदावरची शिवसेना संपवली असेल, मात्र त्यांना जमीनिवरची त्यांना संपवता येणार आहे. भाजप हा पक्ष कागदावर्ती आहे मात्र जमिनीवर नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदेंवर ‘शहा सेना’ म्हणून टीका
‘सामना’च्या अग्रलेखातून महायुतीला लक्ष्य करताना म्हटले आहे की, “जेव्हा राजकारणात विचारधारा आणि ठाम भूमिका शिल्लक राहत नाही, तेव्हा निवडणुका केवळ नावापुरत्या उरतात.” एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘शाह सेना’ असे संबोधत, ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेली संधीसाधू शक्ती असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना कठपुतळी बनवून ही ‘कृत्रिम लाट’ निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.