मुंबई : मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे.
या संस्थेने ‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘ट्री सीटी’ २०२१’ साठीचा बहुमान मुंबईला घोषित केला आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे ‘स्वप्न नगरी’ अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता ‘वृक्ष नगरी’ अशी एक नवी ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी विशेष बैठक झाली. यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुकही केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त, सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
[read_also content=”मुंबईत १ मे पासून मागेल त्याला दूषित पाणी, पाणी चोरी थांबणार; पालिकेचे नवे धोरण https://www.navarashtra.com/maharashtra/contaminated-water-water-theft-will-stop-in-mumbai-from-may-1-new-policy-of-the-municipality-nrdm-267632.html”]
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारतातील केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे अशीही माहिती परदेशी यांनी दिली आहे.