फोटो सौजन्य AI
प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना फटकारले. आता रुग्णालय सुरू करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ४,७७०.१२ चौरस मीटर जागेवर हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.
रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण ९१ पदांपैकी ६० पदे भरण्यात आली आहेत. अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या उपकरण खरेदीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय राज्य योजनेतून सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बहुतांश उपकरणे उपलब्ध झाली असून, उर्वरित सुमारे २० टक्के उपकरणेही लवकरच येणार आहेत.विद्युत कामेही रखडली आहेत .उपकरणे बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने संबंधित कक्षांमधील विद्युत फिटिंगचे कामही प्रलंबित असल्याची माहिती आहे. आवश्यक विद्युत जोडणीशिवाय आधुनिक उपकरणे सुरु करता येणार नाहीत .
Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
वैद्यकीय संचालक लवकरच रुग्णालयाला भेट देऊन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही वैद्यकीय संचालक मेडिकलमध्ये आले होते, मात्र, त्यावेळी डेंटल सुपरस्पेशालिटी प्रकल्पाकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विलंबाबाचत अधिष्ठाता कार्यालयापासून वरिष्ठ प्रशासकीय पातळीपर्यंत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सामान्यतः निधीअभावी प्रकल्प रखडतात. मात्र, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध असूनही प्रशासकीय पातळीवर अपेक्षित गती नसल्याने विलंब होत असल्याचे चित्र आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी प्रकल्पाच्या कामात सक्रिय भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.
त्यांच्या बदलीनंतर प्रभारी अधिष्ठाता जबाबदारी सांभाळत आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी बऱ्याच कालावधीत बैठक न झाल्यानेही काम रखडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाबाबत विचारणा झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक घेण्यात आल्याचेही सांगण्यात येते.
Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात
विलंबामुळे उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता असून, सुपरस्पेशालिटी उपचाराची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णानाही आणखी काही काळ थांबावे लागणार आहे. याशिवाय रुग्णालय सुरू झाल्यानंतर विविध विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी तीन जागा वाढण्याची अपेक्षा होती.
मात्र, प्रकल्प रखडल्याने या प्रक्रियेलाही विलंब झाला आहे. नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा सध्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट होऊन ४४ पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. सध्या प्रथम वर्षात २१ विद्यार्थी आहेत.






