फोटो सौजन्य AI
नागपूर शहरातील पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बचत भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पेंच जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने शहरात पाणी कपात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सणासुदीचा काळ आणि जलसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर महापालिकेने हा निर्णय पुढे ढकलला होता. आता घरगुती पाणीपुरवठ्यावर निर्बंध न आणता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत
पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. शहरात १० नवीन हायड्रंट उभारण्यासह जलवाहिन्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सुमारे ४०० विहिरींवर सौरऊर्जा यंत्रणा उभारण्याची तयारी करण्यात येणार आहे.
प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. जलतरण तलाव, उद्याने आणि इतर बिगरपिण्याच्या कामांसाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
Nagpur News : बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
नागपूरच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने कन्हान-कोलार बॅरेज प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ९५२ कोटी रुपये असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडेही यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२७ पर्यंत पेंचमधून १९० एमसीएम पाणी मिळण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महापौर नीता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागाचा दुपारी २ ते ४ आणि शहरी भागाचा सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आढावा घेण्यात आला.






