फोटो सौजन्य-iStock
नागपूर : माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू प्रभाकर भोयर यांच्या अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रेशीमबाग येथील पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली.
हेदेखील वाचा : Guardian Minister : जिल्हा बँकेच्या संचालिकेने साताऱ्याच्या राजेंसाठी थोपाटले दंड, पोलिस कर्माचाऱ्यानेही केलं होतं आंदोलन
हर्षवर्धन श्रावण झंझाड यांच्या तक्रारीवरून 2 जुलै 2019 रोजी सक्करदरा पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकाविरुद्ध फसवणूक आणि एमपीआयडी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविला होता. प्राथमिक तपासात अरुण लक्ष्मण फलटनकर, चंद्रकांत अजबराव बिहारे, प्रियदर्शन नारायण मंडलेकर, रामदास समर्थ, राजू रामभाऊ घाटोळे, मधुकर गोपाळ धवड, संगीता अनिल शाहू, सुभाष शुक्ला, प्रसाद प्रभाकर अग्निहोत्री आणि व्यवस्थापक निशा जगनाडे यांची नावे पुढे आली होती.
हर्षवर्धन यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी एफडीवर तिमाही 6 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एक लाख रुपये जमा करायला लावले. त्यांच्याप्रमाणे इतर 10 जणांकडूनही जवळपास 50 लाख रुपये गुंतवून घेतले. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागले.
अखेर त्रस्त होऊन गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार केली. फलटनकर, बिहारे, मंडलेकर, घाटोळे आणि अग्निहोत्री यांना तपासादरम्यानच अटक करण्यात आली. इतरांना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला आणि ते सर्व जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत.
33 लाखांचे बोगस कर्ज केले जारी
या दरम्यान सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक सुनील दहाघाने यांनी वर्ष 2010 पासून संस्थेत झालेल्या व्यवहारांचे ऑडिट केले. त्यांच्या अहवालात, त्यांनी अनेक अनियमितता उघड केल्या आणि 12 जुलै 2023 रोजी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (ईओडब्ल्यू) कडे लेखी तक्रार केली. सोबतच वर्तमान अध्यक्ष ऍड. रमन सेनाड यांनीही 24 जुलै 2024 रोजी सोसायटीच्या माजी संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्याची तक्रार केली. प्राथमिक तपासात छोटू भोयर हे 2010 ते 2015 सालापर्यंत पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष असल्याचे पुढे आले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात 26 कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली. 26 लोकांच्या नावावर बनावट कागदपत्र बनवून 33 लाख रुपयांचे बोगस कर्ज जारी केले.
25 पर्यंत पोलिस कोठडी
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक रिझवान शेख यांनी बुधवारी सकाळी या प्रकरणात छोटू भोयर यांना अटक केली. दुपारनंतर भोयर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनुसार, आतापर्यंत संस्थेत 3.41 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. भविष्यात यात आणखी वाढ होऊ शकते.
हेदेखील वाचा : Suresh Dhas : परळीच्या तहसीलसमोरच महादेव मुंडेला भोसकलं….; अखेर आकाचे नाव घेत सुरेश धस यांचा आणखी एक गौप्यस्फोट