
अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार
न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी शिक्षक आनंद चौहान यांची फौजदारी पुनर्विचार याचिका फेटाळली. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने ७ डिसेंबर २०१९ रोजी दिलेल्या आदेशाला त्यांनी आव्हान दिले होतं. आनंद चौहान हे शिक्षक असून, त्यांना दरमहा ७१ हजार रुपये पगार मिळतो. त्यांची पत्नीही शिक्षिका असून, तिचे मासिक वेतन ४० हजार रुपये आहे. पत्नी स्वतः कमावत असल्याने कौटुंबिक न्यायालयाने तिला पोटगी देण्यास नकार दिला होता. मात्र, दोन्ही मुलांच्या पालनपोषणासाठी प्रत्येकी सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
वडिलांचा नेमका युक्तिवाद काय?
मुलगी सज्ञान असून, अविवाहित आहे. त्यामुळे तिला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अंतर्गत पोटगी मिळू शकत नाही, असा युक्तिवाद वडिलांच्या वतीने करण्यात आला. मुलीने पोटगीसाठी हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६ च्या कलम २० (३) अंतर्गत स्वतंत्र अर्ज करावा, असेही त्यांनी म्हटले. याशिवाय, याचिका न्यायालयात प्रलंबित असताना मुलगाही सज्ञान झाला. त्यामुळे त्यालाही पोटगी देता येणार नाही, अशी भूमिका वडिलांनी मांडली.
न्यायालयाने काय स्पष्ट केले?
मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते हे सिद्ध करण्यात वडिलांना यश आले नाही, असे निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले. त्यामुळे केवळ मुलगी सज्ञान झाली आहे किंवा पोटगीसाठी दुसरा कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे, या कारणावरून तिची पोटगी नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पोटगीचा आदेश देण्यात आला त्यावेळी मुलगा अल्पवयीन होता. मात्र, आता तो सज्ञान झाला आहे. त्यामुळे त्याच्या पोटगीत बदल करण्याची गरज असल्यास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२७ अंतर्गत योग्य न्यायालयात अर्ज करता येईल, असंही न्यायालयाने सांगितलंय.
FAQ (Frequently Asked Question)
अविवाहित मुलीला पोटगी मिळते का?
– हो, मिळते, पण 2 कायदे आहेत -CrPC 125 (आता BNSS 144): यात फक्त अल्पवयीन मुलांना आणि दिव्यांग प्रौढ मुलांना पोटगी मिळते. सशक्त, निरोगी प्रौढ अविवाहित मुलीला या कलमाखाली पोटगी मिळत नाही – Supreme Court चा Abhilasha vs Prakash (3 जज बेंच) निकाल. Hindu Adoptions and Maintenance Act 1956 – कलम 20(3) : यात मात्र हिंदू वडिलांवर बंधन आहे – अविवाहित मुलगी स्वतः कमवू शकत नसेल तर तिच्या लग्नापर्यंत वडिलांनी तिचा सांभाळ करावा, ती 18 वर्षांवरील (प्रौढ) असली तरीही. हा खरा अधिकार आहे.
मग कशी मिळवायची पोटगी?
– जर मुलगी प्रौढ अविवाहित असेल आणि कमवत नसेल, तर तिला Family Court मध्ये HAMA 1956 च्या कलम 20(3) अंतर्गत दिवाणी दावा दाखल करावा लागेल. CrPC 125 चा संक्षिप्त अर्ज चालणार नाही. पण जर Family Court मध्येच 125 चा अर्ज असेल, तर कोर्ट एकाचवेळी HAMA चा लाभ देऊ शकते – SC ने हे मान्य केले आहे.