नाना पटोलेंनी नव्या प्रदेशाध्यक्षांचं केलं तोंडभरुन कौतुक; नेमकं काय म्हणाले?
मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेले आहे. यावरुन आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ पक्ष नेते म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन करून नाना पटोले यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांना दांडगा अनुभव असून विविध पदावर त्यांनी काम केले आहे. राजीव गांधी पंचायत राज संगठनचे ते विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. विद्यार्थी दशेपासून ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदासह पक्ष संघटनेत विविध पदावर काम करत त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदयी विचारांवर काम करणारे ते कार्यकर्ते आहेत.
महाराष्ट्र राज्य काँग्रेस विचाराला माननारे राज्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल. त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करून पटोले यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नवनियुक्त विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील चोरट्याचा साळसूदपणा! गाडी चोरली अन्…; पोलिसांची केली मोठी कारवाई