सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : पुण्यातील गुन्हेगारीची व गुन्हेगारांची कहाण्या या कायम चर्चेत असतात, अशीच एक कहाणी सध्या चर्चेत असून, एका चोरट्याने दुचाकी चोरली काम फत्ते झाल्यानंतर पुन्हा ती दुचाकी त्याच ठिकाणी आणून पार्क करत त्यावर ‘तुमची गाडी चोरली होती, पण परत आणून दिली आहे. त्यामुळे पोलिसात चोरीची तक्रार दिलेली असल्यास मागे घ्या,’ असा संदेश टोपीवर लहून ठेवत पळ काढला. आता या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून घरफोडीचे १४ गुन्हे उघडकीस आणत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. घोटावडे फाटा, मुळशी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण ५१ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव व पथकाने केली आहे.
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या टोळक्याचा धुमाकूळ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या घरफोडीतील आरोपी म्हसोबा गेट येथे पीएमपी थांब्यावर थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अजित बडे आणि पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी सापळा लावून संशयिताला पकडले. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याने शिवाजीनगरमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर आरोपीची घर झडती घेतल्यावर सोन्या-चांदीचे दागिने आणि घरफडीचे साहित्य सापडले. सखोल तपासात त्याने विविध भागात १४ घरे फोडल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चोरलेली गाडी परत सोडली
हर्षदकडे पोलीस सखोल चौकशी करत असताना त्याने सांगितले की, आळंदीत घरफोडी केली. या घरफोडीसाठी बावधन येथून एक दुचाकी चोरली होती. घरफोडी करून आल्यानंतर ती गाडी पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडली दोन दिवसांनी गाडी सोडताना हर्षदने त्या गाडीवर व मालकासाठी टोपीवर चिठ्ठी लिहिली. गाडी पुन्हा त्याच जागी सोडल्याचा दावा चोरट्याने पोलिसांकडे केला.
चोरट्याचा बस, रिक्षाने प्रवास
आरोपी हर्षद पवार प्रवासासासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यायचा. क्वचितच त्याने दुचाकीचा वापर केला. दुचाकीवरून प्रवास केल्यास ‘सीसीटीव्ही’ कैद होऊन पोलिसांना तपासात मदत होईल, असा विचार तो करीत असे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
आरोपीकडे ४९ ‘मास्टर चाव्या’
पोलिसांना हर्षद पवारच्या घरी घरफोडी करण्यासाठीचे साहित्य सापडले. त्यात कटावणी, स्क्रु ड्रायव्हरसह विविध प्रकारच्या ४९ चाव्या सापडल्या आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
तो थेट न जाता वेगवेगळ्या वळण घ्यायचा
हर्षद सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला पोलिसांच्या तपासाची पध्दत माहिती आहे. तो चोरी केल्यानंतर थेट ठिकाणावर न जाता वेगवेगळ्या वाटा निवडत असे. तो वारजेला जायचे असेल तर प्रथम डेक्कन, मग शिवाजीनगर, नंतर लष्कर तेथून स्वारगेट आणि सिंहगड रोडने वारजेत जात असत.