
२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात
लोहा : महाराष्ट्राने १९७२ मध्ये भीषण कोरडा दुष्काळ अनुभवला होता. त्या काळातील जाणकारांच्या आठवणीनुसार पोळ्यानंतर झालेल्या पावसामुळे काही भागातील परिस्थितीला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, २०२६ मधील कोरड्या दुष्काळाची तीव्रता वेगळीच असून, यंदा खरीप हंगामातील उभे पीकच पावसाअभावी करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व आर्थिक संकट उभे ठाकले आहे. लाखो रुपये खर्च करून पेरणी, खते, औषध फवारणी आणि मशागतीचा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी अखेर घोर निराशा पडली आहे.
२०२५ मध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या संकटातून सावरत असतानाच शेतकऱ्यांनी उसनवारी, व्याजाने कर्ज आणि खासगी सावकारांकडून पैसे घेऊन जून महिन्यात पुन्हा खरीपाची पेरणी केली. यंदा पाऊस सुरुवातीला झाला; मात्र त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर यांसह विविध खरीप पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पिके अक्षरशः करपून गेली असून उत्पादनाची आशाच मावळली आहे.
शेतकरी आर्थिकदृष्ट्या झाला उद्ध्वस्त
गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले, तर यंदा कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवरच घाला घातला. कर्जाचा वाढता डोंगर, उत्पादन खर्चाची भरपाई न होणे आणि पुढील हंगामासाठी भांडवलाचा अभाव यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवरील वाढत्या आर्थिक व मानसिक ताणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रभावी मदतकार्य हाती घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, कर्जविषयक दिलासा आणि पुढील हंगामासाठी आवश्यक आधार मिळणे गरजेचे आहे.
चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर
पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान जनावरांच्या चारा आणि पाण्याचे आहे. शेतात चारा उपलब्ध नसल्याने जनावरे जगवायची कशी, त्यांच्यासाठी चारा कुठून आणायचा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. मराठवाड्यातील अनेक धरणे व तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणात सध्या सुमारे ३६ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असून, या धरणावर लोह्यासह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पाणीसाठा जपा
काही तलावांमध्ये अद्याप थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या पाण्यावर मोठ्या प्रमाणात मोटारीद्वारे उपसा केला जात असल्याची परिस्थिती आहे. उपलब्ध पाणी शेतीसाठी अनिर्बंधपणे उपसले गेले, तर आगामी काळात पिण्याचे तसेच जनावरांचे पाणीही टंचाईत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन महिने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
पाणीयोजना कार्यान्वित
लोहा शहराला लिंबोटी धरणावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. लोहा शहरात सुमारे १० हजार मालमत्ता धारक असून अधिकृत नळजोडण्यांची संख्या सुमारे १,८०० आहे. उर्वरित अनेक कुटुंबांचा पाणीपुरवठा घरगुती बोअरवेलवर अवलंबून आहे. सुनेगाव तलावात सध्या दोन ते तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे मुख्याधिकारी भोळे यांनी सांगितले.