संग्रहित फोटो
मुंबई : ठाकरे बंधूंच्या कालच्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना ‘गजनी’ अशी उपमा दिली होती. फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या अखेरच्या काळाचा दाखला देत, “ब्रिटिशांचा मेंदू हलला होता, तसाच भाजपचा मेंदू हलला आहे,” अशी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील मोर्चाला लाखो लोक उपस्थित होते, असा दावा राऊत यांनी केला आहे. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ओमराजेंवरही राऊतांचा हल्लाबोल
यावेळी संजय राऊत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली. विद्यार्थ्यांच्या गर्दीतून ‘गद्दार’ अशी घोषणाबाजी झाल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, “ज्यांनी गद्दारी आणि बेईमानी केली, त्यांना जागोजागी अशा प्रकारे अपमानित व्हावं लागत आहे.” एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला 5-50 कोटी रुपये दिले असतील; पण ते तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकत नाहीत. ते तुम्हाला पोलिसांच्या दोन गाड्या पुढे-मागे देऊ शकतात, मात्र प्रतिष्ठा आणि मानसन्मान तुम्ही गमावला आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.
‘फडणवीसांनी आता न्यायमूर्ती भुइयांनाही गजनी म्हणावं’
निवडणूक आयोगावर टीका करणारे उज्ज्वल भुइयां यांच्या वक्तव्याचा दाखला देत राऊत यांनी फडणवीसांवर टोला लगावला. “न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांनी निवडणूक आयोगावर परखड मत मांडलं आहे. कोट्यवधी नागरिकांनी मतदानाचा अधिकार गमावला असेल तर ते चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी भुइयां यांनाही ‘गजनी’ म्हणावं,” असं राऊत म्हणाले.
‘ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. “ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा काय, अजून बरंच काही व्हायला पाहिजे,” असं ते म्हणाले. तसेच अमित शाह आणि सीमा खन्ना यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. “अमित शाह भूमिगत आहेत, सीमा खन्ना भूमिगत आहेत,” असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही राऊत यांनी मोठं भाकीत केलं. “मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील अखेरचा काळ सुरू आहे. भविष्यात मोदी सत्तेत राहणार नाहीत,” असं राऊत म्हणाले.
‘फडणवीस पाईपलाईनमध्ये, पण बाहेर पडावं लागेल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. “फडणवीस सध्या केंद्रामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी पाईपलाईनमध्ये आहेत. मात्र त्यांना त्या पाईपलाईनमधून बाहेर पडावं लागेल. त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे,” असा दावा राऊत यांनी केला. गर्जना मोर्चाला मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रतिसाद ही देशाची भावना असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. मुंबईच्या रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन झालं, त्याचप्रमाणे दिल्लीच्या रस्त्यांवरही शक्तिप्रदर्शन होत असल्याचं ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा : एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद






