File Photo : Chhagan Bhujbal
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळात माजी मंत्री छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही. त्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले, ‘राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. मी अनेकांचे पतंग कापले आहेत. त्यामुळे माझा पतंग कोणी कापू शकणार नाही’.
राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र, भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले. या नाराजीतून त्यांनी पक्षावर दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्यांनी घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत. पुढे भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते. आता परतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी राजकीय फटकेबाजी सुरू केली आहे.
सध्या येवला या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले भुजबळ म्हणाले की, जनतेने मला 20 वर्षे काम करण्याची संधी दिली आहे. शिवाय पुढील पाच वर्षे आमदारकी ही बहाल केली आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. अशा स्थितीत माझा पतंग कोणीही कापणार नाही.
दरम्यान, माझ्या विरोधात कोणी काही बोलले नाही. त्यामुळे मीही कोणावर बोलणार नाही. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे म्हणत भुजबळांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकला.
बीडसारखी स्थिती इतर कुठे होऊ नये
बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती कोणत्याच ठिकाणी होता कामा नये. त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. एखाद्या जिल्ह्यात, तालुक्यात अशी परिस्थिती झाली असेल, याचा अर्थ संपूर्ण राज्यात ती तशी आहे असे नाही. आताच शेगावहून आलो आहे. तिकडे तसे काहीही नाही, असेही भुजबळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबत म्हणाले…
लाडकी बहीण योजनेबाबतही भुजबळ बोलले आहेत. नियमात बसत नाहीत अशा महिलांनी स्वतःहन आपली नावे काढून घ्यावीत. अन्यथा दंडासह वसुली केली जाईल, असे संकेतही भुजबळ यांनी दिले आहेत. एकीकडे सरकारने योजनेतून कोणालाही बाहेर केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. तर भुजबळ दुसरेच बोलत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे
कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. चारचाकी नसावी. एका घरातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, त्याचा फायदा एकाच घरातील अनेक महिला घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत. तसेच वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत चुकीची माहिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.