
मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतानांचा फोटो; दादा भुसे म्हणाले, ‘फोटो असेल तर काढायला लावणार’
उपमहापौरांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत टिपू सुलतान यांचाही फोटो असल्याचे दिसून आले. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो लावणार असल्याचे शान-ए-हिंद यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केल्यानंतर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यामागील भूमिका स्पष्ट केली. टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
मात्र, यापूर्वीही मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा हा फोटो झळकल्याने विरोधी पक्षातील सदस्य आणि इतर राजकीय नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
या वादावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. मालेगाव महापालिकेच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला आहे की नाही, याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो लावण्यात आला असल्याचे स्पष्ट झाल्यास तो काढण्याच्या सूचना दिल्या जातील, असे भुसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे या मुद्द्यावरून मालेगावमध्ये पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दादा भुसे यांनी शाळा आणि खासगी क्लासेसच्या विषयावरही पत्रकार परिषदेत माहिती दिली. शाळा किंवा महाविद्यालय आणि खासगी क्लासेसमध्ये असे टायअप असल्याचे आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच खासगी क्लासेसकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही सभागृहात निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.