खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
यावरून दिनकर पाटील व शिंदे सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्यात जोरदार खडाजंगी होवून व्यक्तीगत आरोप करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक अमोल पाटील यांनी स्वतः खड्ड्यात पडल्याचा उल्लेख करून प्रभाग नऊ मध्ये २८७ खड्डे असून त्याची यादी आपण अधिकाऱ्यांना देवूनही ते बुजविले गेले नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (Nashik News)
गेल्या दिड महिन्यांपासून उपचार घेत असलेले अमोल पाटील है महासभेत पायाला प्लास्टर करून दाखल झाले. त्याना स्वतंत्र खुर्ची देण्यात आली. उभे राहता येत नसल्याने त्यांनी बसूनच आपले प्रश्न मांडले. त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. आपले प्रश्न संपल्यानंतर पुन्हा ते सभागृहातून रवाना झाले.
दरम्यान, खड्ड्यांच्या प्रश्नावरून बोलतांना दिनकर पाटील यांनी अनेक वेळा शहर अभियंत्यांची बदली करण्याचा विषय येतो, गटनेते अजय बोरस्ते यांनी देखील मागणी केली होती; परंतु पुढे त्यांनी या विषयावर चूप राहणे पसंत केल्याचे म्हटल्याने त्याला गटनेते अजय बोरस्ते यांनी आक्षेप घेतला. बोरस्ते यांनी पलटवार करीत, खड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी शिवसेनेने केली व शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली हे विसरू नका असा दम भरीत, सभागृहात व्यक्तिगत आरोप होत असतील तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, सायंकाळी शहर अभियंत्याच्या दालनात कोण बसलेले असते? जास्त बोलण्यास भाग पाडू नका असा इशारा देत नगरसेवक अमोल पाटील यांच्या अपघाताबद्दल आपल्यालाही दुख झाल्याचे सांगितले. सभागृहात नौटंकी बंद करा, गेल्या सभेत खड्ड्यांवर का बोलले नाहीत अशा शब्दात दिनकर पाटील यांना सुनावले. हा प्रकार घडत असतांना सभागृहात एकदम शांतता पसरली. अखेर महापौरांनी मध्यस्थी करीत पुढील विषय पुकारत वादावर पडदा टाकला.
याच प्रश्नांवर दिनकर पाटील यांनीही पुढे बोलतांना सन २०२२ पासून शहरात किती रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले. अशा रस्त्यांवरच खड्डे पडले काय ? याकामांचे कार्यारंभ आदेश देण्याची मागणी करूनही अधिकाऱ्याकडून उत्तरे देण्यात आली नसल्याचे सांगितले. बांधकाम विभागाने कोणत्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले? ठेकेदारावर रस्ता केल्यानंतर तीन वर्षे जबाबदारी असतांना त्यांनी ती पार पाडली? खड्डे कोणी बुजविले अशा प्रश्नांची सरबत्ती करीत शहर अभियंता व बांधकाम खात्याने संपुर्ण शहराला वेठीस धरल्याचे सांगितले. शहर अभियंत्यांनी बदली करा व रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली. आपण मागितलेली माहिती विस्तृत स्वरूपात पुढच्या महासभेत देण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली.
MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात






