नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Nashik Earthquake News In Marathi: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे (Nashik Earthquake) सौम्य धक्के जाणवले आहेत. पेठ तालुक्यात बुधवारी (19 ऑगस्ट 2026) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जमिनीला कंप जाणवला. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जाणवलेल्या या कंपनांमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.
सकाळच्या वेळेत अनेक नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्याचवेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांची धावपळ झाली. काही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झाल्याची माहिती नाही.
MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
नाशिक जिल्ह्यात मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. साधारणपणे ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि या कंपनांच्या मालिकेमागील भौगोलिक कारणांचा अभ्यास करण्याची गरजही व्यक्त होत आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री सुमारे ७.४० वाजता जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कांगडा जिल्ह्यातील दारिणी धार परिसरात असल्याचे सांगण्यात आले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंपानंतर जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कांगडा आणि चंबा हे हिमाचल प्रदेशातील भूकंपीयदृष्ट्या संवेदनशील भाग असून, त्यांचा समावेश भूकंपीय क्षेत्र-५ मध्ये केला जातो. त्यामुळे या भागात भूकंपाच्या घटनांकडे विशेष गांभीर्याने पाहिले जाते.
नाशिकमध्ये वारंवार जाणवणारे सौम्य धक्के आणि हिमाचलमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि भूकंपाच्या वेळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.





