मुंबई : एनसीबीने (NCB) गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर (Cardelia Cruz) छापा टाकला होता. कार्डेलिया क्रूज प्रकरणातील ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कारवाईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी एनसीबीचे अधीक्षक विश्वविजय सिंग हे होते. विश्वविजय सिंग (Vishwavijay Singh) यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
विश्वविजय सिंग यांच्यावर बडतर्फची कारवाई दुसऱ्या प्रकरणात झाली आहे. आर्यन खान प्रकरणातील कारवाई एनसीबीचे तत्कालीन विभाग संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. पण, विश्वविजय सिंग यांना गेल्या वर्षी एका वेगळ्या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आले होते. सध्या चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर आता बडतर्फीची बडगा उगारण्यात आला आहे.
शिस्तभंगाची कारवाई
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान प्रकरणात कारवाई झाली. त्यावेळी वानखेडे यांच्या पथकात असलेल्या विश्वविजय विरोधात शिस्तभंगाच्या तसेच अन्य काही प्रकरणांमध्ये काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारी वाढल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना सेवेतून निलंबित करण् आले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर शिस्तभंगाचा ठपका ठेवत अखेर सोमवारी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.