मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारानंतर आता पवार विरुद्ध हजारे असे राजकीय द्वंद्व सुरु झाले आहे. शरद पवार यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख केला होता. त्यावरुन या वादाची ठिणगी पडली. यानंतर अण्णा हजारे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. या प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी अण्णा हजारे यांना ‘स्वयंघोषित गांधी’ म्हणत टीकास्त्र डागलं आहे.
शरद पवार – अण्णा हजारे वाकयुद्ध
शरद पवार यांनी अंतिम टप्प्यातील प्रचारावेळी एका मुलाखतीमध्ये अण्णा हजारे यांचा उल्लेख केला होता. शरद पवार म्हणाले, माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे व इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत? असा सवाल करत शरद पवार यांनी टीका केली होती. यावर अण्णा हजारे यांच्याकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. हजारे म्हणाले, “शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली,” असे चोख प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिले.
रोहित पवारांचा पलटवार
या वादामध्ये आता आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली. रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्या टीकेवर पुन्हा एकदा पलटवार केला. रोहित पवार म्हणाले, “2014 पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी 2014 नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.