फोटो सौजन्य - Social Media
संतोष पेरणे, कर्जत (रायगड): कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर किकवी-शिलार येथे प्रस्तावित शिलार धरणाला विरोध करण्यासाठी परिसरातील शेतकरी एकवटले आहेत. या धरणामुळे बाधित होणाऱ्या २४ गावे व वाड्यांमधील शेतकरी १७ मार्च रोजी कर्जत येथे मोठा मोर्चा काढणार असून तहसील कार्यालयावर धडक देणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी कर्जत शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून स्थानिक शेतकऱ्यांची संमती न घेता धरणाच्या कामासाठी हालचाली सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी एकत्र येत शिलार धरण विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून १७ मार्च रोजी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पाविरोधात समितीने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत धरण रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धरणाविरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे धरणाच्या कामासाठी कार्यालये उभारण्यासाठी जलसंपदा विभागाला भाड्याने जमीन मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे. तसेच सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांनी परत पाठवल्याची माहिती आहे.
पाथरज, मोगरज, जामरुंग, कशेळे, रजपे आदी गावांसह धरण क्षेत्रातील अनेक ग्रामसभांनी धरणविरोधी ठरावही मंजूर केले आहेत. त्यामुळे शिलार, खरबाचीवाडी, किकवी-बोरवाडी, शिलारवाडी, धोत्रे, शिंगढोळ, टेंभरे, आंबीवली, पिंगळस, फणसवाडी, खांदन, कोठींबे, आनंदवाडी, जाधववाडी, चौधरवाडी, धामणी आणि जांभूळवाडी आदी गावांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौकातून हा मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने शेतकरी कर्जत शहरात दाखल होणार असल्याने शहरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.






