मुंबई : तत्कालीन गृहंमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर श्याम मानव यांच्या या दाव्यांना अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी त्यांना ऑफर दिल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
श्याम मानव यांच्या या दाव्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना या दाव्यांमध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला ही ऑफर दिली होती. या ऑफर सदंर्भातील सर्व भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणेन, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे उद्धव ठाकरे यांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. पण मी तो आरोप केला नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालीयनवर बलात्कार करून तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप करण्यासाठी दबाव टाकला गेला, अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यासा सांगितले गेले. पण मी तेही करण्यास नकार दिला.
इतकेच नव्हे तर, अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधींची कमाई करून देण्यास सांगितले, असा जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, आणि 100 कोटींच्या वसुली प्रकरणातून सुटका मिळवा, अशीही ऑफर देण्यात आली, पण मी हे सर्व कऱण्यास नकार दिल्यानेच मला 13 महिने तुरुंगात राहावे लागले, असा दावा देशमुख यांनी केला.
दरम्यान, ही ऑफर दिली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. तुम्ही या ऑफरबद्दल शरद पवार किंवा अजित पवार यांना कल्पना दिली होती का, असा सवाल विचारला असता अनिल देशमुख यांनी मौन बाळगले. पण देवेंद्र फडणवीसांच्या खास माणसाकडून ही ऑफर देण्यात आली होती. याचा पुनरुच्चार त्यांनी केला.