लोणावळा : पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला मास्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोची जोरदार धडक बसल्याने टेम्पोचा चुराडा झाला. या भीषण अपघातात टेम्पोच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मोठ्या प्रमाणात मास्यांची नासाडी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मोहम्मद अजमल रोशन (वय-२२, रा. मुलकी, मंगलोर, दक्षिण कन्नड, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या टेम्पो क्लिनरचे नाव असून, शाहुल हमीद (वय-२५, रा.कर्नाटक) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून मुंबईला मासे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो भरधाव वेगात अमृत अंजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला धडकला. हि धडक इतकी भीषण होती की, या धडकेत टेम्पो अक्षरशः चुराडा झाल्याने यामध्ये टेम्पोच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक गंभीर झाला.
चिलापीचे मोठे नुकसान
चिलापी मच्छीचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. अपघातानंतर मार्गावर मासे विखुरले होते. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ए. एल. धायगुडे त्यांचे सहकारी, देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने अपघातातील जखमी व मयताला बाहेर काढून, अपघातग्रस्त टेम्पो ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मार्गावर विखुरलेले मासे गोळा केल्यानंतर परिसर पाण्याने धुऊन काढला. त्यानंतर अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत चालू झाली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.