पालघरमध्ये औषध बनवणाऱ्या कंपनीला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, कंपनीचे मोठे नुकसान
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लॉट क्रमांक 43- 44 – 45 मधील सफायर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध बनविणाऱ्या कंपनीत आज (21 जुलै) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळाने आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी कंपनीत दोन्ही सत्रातील कामगार उपस्थित होते. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. कंपनीचे यंत्रसामग्रीचे बऱ्यापैकी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे
सफायर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही औषध निर्माण करणारी कंपनी आहे. यावेळी कंपनीतील पहिल्या सत्रातील व दुसऱ्या सत्रातील साधारण 200 च्या आसपास कामगार कंपनीच्या आवारात उपस्थित असल्याचे कामगारांनी नवराष्ट्र ला सांगितले. साधारण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कंपनीत आग लागली मात्र त्यावेळी त्याचे स्वरूप जास्त नव्हते असे काही बघणाऱ्यांनी सांगितले. मात्र तीनच्या सुमारास आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे व धुराचे प्रचंड लोट पहावयास मिळत होते. तीन वाजण्याच्या सुमारास कंपनीत असलेले नायट्रोजन सिलेंडरची व केमिकलचे बॅरेलचे स्फोट व्हायला सुरुवात झाली त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले यावेळी स्फोटाचा आवाज साधारण एक ते दीड किलोमीटर पर्यंत ऐकू येत होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
कंपनीचे पहिल्या सत्रातील कामगार घरी जाण्याच्या तयारीत असताना व दुसऱ्या सत्रातील कामगार कामावर यायच्या वेळेस कंपनीस आग लागली. यावेळी कंपनीचे आवारात कामगारांची संख्या 200 ते 250 च्या आसपास असल्याची माहिती एका कंपनीतील कामगारांनी दिली मात्र या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
आग विझविण्यासाठी पालघर नगरपरिषद बीआरसी व बोईसर एमआयडीसीचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. त्याच्या अथक प्रयत्नानंतर आग वीझवण्यात यश आले कंपनीच्या आजूबाजूला कंपनीने केलेल्या अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाला आत मध्ये शिरण्यास जागा उपलब्ध होत नव्हती त्यामुळे अग्निशमनदलाला साधारण अर्धा तास काहीच करता आले नाही. अग्निशमन दलाकडे ऑक्सिजन मास्क असणे बंधनकारक असताना पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दलाकडे ऑक्सिजन मास्क उपलब्ध नव्हते त्याच वसाहतीतील निऑन कंपनीकडे असलेले ऑक्सिजन मास्क त्वरित उपलब्ध करून दिले. मात्र धुराचे प्रचंड लोट निघत असल्यामुळे अग्निशमन दलातील जवान सुद्धा आत मध्ये जाण्यास धजावत नव्हते.