
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना दे धक्का
महेश लांडगेंवर टीका करणे भोवल्याची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेने खेचून आणली विजयश्री
Municipal Election Result 2026: आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान मुख्य लढत ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेत असल्याचे म्हटले जात होते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्रित लढले. तर भाजप व शिवसेना एकत्रित लढले. मात्र या दोन्ही ठिकाणी काका-पुतण्याला मोठा पराभव सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका देखील अजित पवारांच्या हातून निसटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा आणि एकतर्फी विजय मिळवत शहरावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण १२८ नगरसेवकांच्या सभागृहात भाजपचे तब्बल ८० पेक्षा अधिक उमेदवार विजयी झाले. या निकालाने भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप या जोडीचा करिष्मा पुन्हा अधोरेखित झाला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आक्रमक प्रचाराची एकतर्फी झुंज अपेक्षित यश मिळवू शकली नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ च्या निवडणुकीतील ३६ जागांच्या आसपासच समाधान मानावे लागले. शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांची स्थितीही फारशी भक्कम राहिली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपची एकहाती सत्ता कायम राहिली आहे.
PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?
भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्ष ही या निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जवळपास प्रत्येक सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. अजित पवार यांनी थेट महेश लांडगे यांनाच लक्ष्य करत ‘कैचीत पकडण्याचा’ डाव आखला होता. मात्र, आक्रमक आणि मैदानात उतरून लढणारे ‘पैलवान’ आमदार म्हणून ओळख असलेल्या लांडगे यांनी ‘स्वाभिमान’ हा मुद्दा पुढे करत अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिले. स्थानिक नेतृत्व, थेट जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे लांडगे यांचा प्रभाव मतदारांवर ठळकपणे दिसून आला.
या निवडणुकीत एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर विजय. ही बाब भाजपसाठी जमेची ठरली. ‘डबल इंजिन सरकार’, विकासकामांचा मुद्दा, तसेच केंद्र आणि राज्यातील सत्ता यांचा फायदा भाजपला मिळाल्याचे चित्र दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा, रोड शो, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक मंत्र्यांच्या प्रचारसभांनी भाजपचा प्रचार अधिक धारदार केला. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला हा विजय अगदी सहज मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.