पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा 'अॅक्शन प्लॅन'; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश
Rain Action Plan 2026 : शहरात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची महापौर रवी लांडगे यांनी गंभीर दखल घेतली आहे. रस्त्यांवरील अर्धवट खोदकामे, खड्डे आणि पाणी साचल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.
अपुऱ्या पाणी निचऱ्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक आणि पादचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरू असलेली खोदकामे तातडीने पूर्ण करणे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची (Hotspots) कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यावर महापौरांनी भर दिला आहे.
Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुरू असलेली सर्व खोदकामे सुरक्षितरीत्या बंदिस्त करून रस्ते पूर्वस्थितीत आणण्यावर भर दिला जाणार आहे. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल तसेच प्रमुख चौक, पुल, अंडरपास व सखल भागात विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख ठेवली जाईल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी २४x७ नियंत्रण कक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार केला जाईल. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असून रोड कटिंग परवानग्यांवर कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी तृतीय पक्ष तपासणी यंत्रणा लागू केली जाणार आहे.
शहरासाठी एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूरस्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुरू करण्यात येणार आहे. अंडरग्राउंड युटिलिटी डक्ट प्रणाली विकसित करून वारंवार होणारी खोदकामे टाळली जातील तसेच सखल भागांमध्ये कायमस्वरूपी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती मोहिम राबवून नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
महापौरांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट जबाबदा-या निश्चित करून कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. दर आठवड्याला प्रगती आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदार व अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
“शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी तातडीने दूर करून भविष्यात अशा समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात,” असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले. महापौरांच्या या पुढाकारामुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला अधिक परिणामकारकपणे सामोरे जाणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






