मूकबधिर दाम्पत्याची हस्तकलेची अनोखी दुनिया;(फोटो- ai gemini)
आंबेगाव बुद्रुक येथील शीतल कवठेकर या गेल्या ११ वर्षांपासून हस्तकला आणि विविध कलात्मक वस्तूंच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. ‘विश्व एक्सक्लुझिव्ह आर्ट गॅलरी’ या नावाने त्या स्वतःच्या कलावस्तूंची निर्मिती आणि विक्री करतात. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही या कामात सहभागी असतात. ऐकू आणि बोलता येत नसले, तरी या मर्यादांना आपल्या कलेच्या आड येऊ न देता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे.
त्यांच्या स्टॉलवर आकर्षक नेमप्लेट, की-होल्डर, फ्रिज मॅग्नेट, रिंग प्लेटर, गणपती सजावटीच्या वस्तू, दिवाळीच्या पणत्या, पारंपरिक रांगोळीच्या सजावटीच्या वस्तू अशा विविध हस्तनिर्मित कलाकृती पाहायला मिळतात. याशिवाय ज्यूटच्या पिशव्यांवर हाताने रंगकाम करून त्या आकर्षक बनवतात. ग्राहकांच्या आवडीनुसार रंग, आकार आणि संकल्पनेनुसार वैयक्तिक डिझाइनही तयार करून देतात. लग्नसमारंभ, कॉर्पोरेट भेटवस्तू आणि सणांसाठी विशेष ऑर्डरही स्वीकारतात.
ग्राहकांना वस्तू दाखवताना, त्यांच्या आवडी समजून घेताना आणि एकमेकांशी खुणांच्या भाषेत संवाद साधताना या दाम्पत्याचा आत्मविश्वास सहज जाणवतो. प्रत्येक वस्तूमागे त्यांची कल्पकता, मेहनत आणि बारकाई दिसून येते.त्यांच्याकडे संवादासाठी शब्द नाहीत; मात्र प्रत्येक कलाकृती काहीतरी सांगते. आवाजाच्या जगात शांतपणे उभे राहून आपल्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने जिद्द आणि आत्मनिर्भरतेचा सुंदर आदर्श ठरते.
आकर्षक आणि वैयक्तिक डिझाइनच्या नेमप्लेट
सजावटीचे की-होल्डर
फ्रिज मॅग्नेट आणि स्टिकी नोट्स
रिंग प्लेटर डिझाइन
गणपती सजावटीच्या वस्तू
दिवाळीसाठी सजावटीच्या पणत्या
पारंपरिक रांगोळीच्या सजावटीच्या वस्तू
हाताने रंगकाम केलेल्या ज्यूटच्या पिशव्या
लग्नसमारंभासाठी खास भेटवस्तू
कॉर्पोरेट गिफ्ट्स आणि सानुकूलित भेटवस्तू
ग्राहकांच्या आवडीनुसार रंग, आकार आणि संकल्पनेवर आधारित विशेष कलावस्तू






