
'विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल'; अभयसिंह जगताप यांचं विधान
म्हसवड : माण-खटावच्या भूमीत राजकीय विरोधक पूर्णपणे संपला पाहिजे ही भूमिका घेऊन सत्ताधारी गटाकडून पोलिसांना हाताशी धरुन अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे. माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे हे त्याचीच शिकार ठरले आहेत. मात्र, यामुळे माण-खटावच्या जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली असून, ही लाट सत्ताधाऱ्यांचे गलिच्छ राजकारण उधळून टाकेल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी व्यक्त करत पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नये, असेही आवाहन केले.
माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असुन, हा गुन्हा सत्ताधाऱ्यांनी महिलेचा आधार घेऊन केला आहे. वास्तविक, हा खोटा गुन्हा असुन आम्ही त्याचा निषेध करण्यासाठीच आज म्हसवड पोलीस स्टेशनसमोर आलो आहोत, असे सांगत जगताप पुढे म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधींना सभापती विक्रम शिंगाडे हे करत असलेले काम खटकत असल्यानेच त्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असावा, ज्या माता माऊलीला हाताशी धरुन हा गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्यावरही राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. मात्र, माण-खटावच्या भुमित सत्तेचा व पोलीस बळाचा वापर सुरु आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिमा मलिन होत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घाणेरड्या व दहशतीच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळली असून, ही सामान्य जनताच यापुढे सत्ताधाऱ्यांचे कुटिल मनसुबे उधळवून लावेल असेही जगताप यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळीही पोलीस बळाचा वापर करुन अध्यक्ष पद पळवले आहे, तर आता ही पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, याची परिपूर्ण माहिती सामान्य जनतेला आहे, ज्या शिंगाडेंवर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना सोशल मीडियाच्या ग्रुपवर खालच्या पातळीवर बोलले गेले. त्या ग्रुपमध्ये पोलीस अधिकारीही आहेत. मात्र, ते त्यावेळी गप्प बसून बघ्याची भूमिका घेत होते.
मग आता कोणाच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घाई पोलीसांनी केली? असा सवाल देसाई यांनी उपस्थित करत येणाऱ्या काळात माण-खटावमध्ये असे खोटे गुन्हे दाखल झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देसाई यांनी दिला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.