
पुणे : लाेकप्रतिनिधींनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयक म्हणूनचं काम केले पाहीजे. प्रशासनाची नकारात्मक भूमिका ही सकारात्मक हाेऊ शकते. यासाठी लाेकप्रतिनिधींचा हेतू हा देखील महत्वाचा ठरताे, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत व्यक्त केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिराेळे यांनी या चर्चेत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि सध्याच्या राजकीय घडामाेडींवर भाष्य करतानाच वडील माजी खासदार अनिल शिराेळे यांचे मार्गदर्शन राजकीय वाटचालीत महत्वाचे ठरत असल्याचे नमूद केले.
पहा सविस्तर मुलाखत
आमदार शिरोळे म्हणाले, शहराच्या इतर भागाप्रमाणेचं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वाहतूक काेंडी हा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न साेडविण्यासाठी वाहतूक पाेलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांची एकत्रित बैठक घेऊनच पर्याय किंवा मार्ग शाेधण्यावर माझा भर असताे. यानुसार घाेले राेड, माॅडेल काॅलनी आदी भागात वर्तुळाकार वाहतुक व्यवस्था निर्माण केल्याने येथील वाहतुक काेंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. गणेश खिंड राेड, सेनापती बापट रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, शिवाजीनगर न्यायालय अशा ठिकाणी हाेणारी वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या गणेश खिंड राेड आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग येथे मेट्राे प्रकल्पाचे काम सुरु आहे. यामुळे हाेणाऱ्या वाहतूक काेंडीचा नागरिकांना त्रास कमी करण्यासाठी मी बैठक घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली आहे, असे शिराेळे यांनी सांगितले.
विद्यापीठ चाैकातील पूलाचे काम लवकर पूर्ण
गणेश खिंड रस्त्यावर विद्यापीठ चाैक येथे दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी मेट्राे मार्ग उभारण्याचे काम सुरु आहे. हा मेट्राे मार्ग पीएमआरडीए कडून उभारला जात आहे. या पुलाचे बांधकाम हे २०२४ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन केले गेले हाेते. पुलाच्या बांधकामाच्या नियाेजनात थाेडे बदल करून हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन केले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाले तर वाहनचालकांना वाहतूक काेंडीतून एक वर्ष आधी सुटका मिळू शकेल, असा विश्वास शिराेळे यांनी व्यक्त केला.
जलपर्णी उच्चाटनसाठी ‘ठाणे माॅडेल’
नदी, तलावात निर्माण हाेणाऱ्या जलपर्णीचे समुळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. यापूवी सातत्याने जलपर्णीचा विषय नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. जलपर्णीचे उच्चाटन करण्यासाठी ‘ठाणे माॅडेल’ हे यशस्वी ठरले आहे. या माॅडेलचा पुण्यात उपयाेग करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात टेकड्यांचे प्रमाण खूप आहे. तेथील जैवविविधतेच्या बाबतीत पर्यावरण प्रेमी आणि नागरिक संवेदनशील आहेत. या भागात काेणतेही विकास काम किंवा पर्यावरणपुरक प्रकल्प राबविताना तेथील नागरिकांची मते जाणूनच काम केले पाहीजे, अशी माझी भुमिका आहे.
पाेलीस वसाहतीचा पुनर्विकास
नदीकाठावर अनेक मंदीर आणि विसर्जन घाट आहेत. या ठिकाणी निर्माण हाेणारे निर्माल्यापासून खत तयार करण्यासाठी तेथेच प्रकल्प उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. पाेलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचे ‘राेल माॅडेल’ याच मतदारसंघात अस्तित्वात आले आहे. त्याच आधारावर पुढील प्रकल्प राबविले जातील. अर्थातच त्यासाठी सीएसआरचा उपयाेग करावा लागेल. पाण्याचा प्रश्न हा समान पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित झाल्यानंतर निश्चितच सुटणार आहे. शाैचालयांकरीता जास्त पाणी साठवण क्षमतेच्या टाक्या बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी धाेरणही ठरविले गेले पाहीजे, असे मत शिराेळे यांनी व्यक्त केले.
भाजपचे विचार आणि कृती चांगलीच
गेल्या पाच वर्षात महापािलकेत भाजपची सत्ता हाेती. या कालावधीत माजी महापाैर मुक्ता टिळक आणि मुरलीधर माेहाेळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिकेत उत्तम काम केले आहे. विशेषत: माजी महापाैर माेहाेळ यांनी काेराेनाच्या कालावधीत सर्वाेत्तम काम केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पुण्यात अनेक विकास कामे मार्गी लागल्याचे मेट्राे प्रकल्पाच्या रुपाने दिसत आहे. नदीकाठ सुधार याेजनेचे काम सुरु झाले आहे. विराेधक आज टीका करीत असले तरी भाजपचे विचार आणि कृती ही नेहमीच चांगली झाली असून, आगामी महापालिकेत पुन्हा भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास आमदार शिराेळे यांनी व्यक्त केला.