File Photo : Suresh Dhas
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. धस यांनी बीड जिल्ह्यातील पोलिसांची चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली. यावेळी सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती. पण त्या आधीच जीव गेल्याने आरोपींचा प्लॅन अयशस्वी झाल्याचे धस यांनी सांगितले.
राखेच्या अवैध वाहतुकीची तत्काळ चौकशी करा, संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करा, बीडमधील राखेची अवैध वाहतूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी सुरेश धस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. काही निवडक पोलिस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप धस यांनी केला.
पोलिस अधिकारी गणेश मुंडेची एसीबी चौकशी सुरू असतानाही त्याला क्रीम पोस्टवर कोणी आणले याची चौकशी करण्यात यावी. बीडमध्ये एकाच ठिकाणी काही पोलिस हे 15-20 वर्षे कसे कार्यरत आहेत, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश धसांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली.
या प्लॅननुसार संतोष देशमुखांना उचलून कळंबला न्यायचे ठरले होते. आरोपींनी कळंबमध्ये एक महिला तयार ठेवली होती. तिच्यासोबत काहीतरी झटापट झाल्याचे दाखवायचे आणि संतोष देशमुखांना मारले असे दाखवायचे होते. पण त्या आधीच संतोष देशमुखांचा जीव गेला. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन अयशस्वी झाला, असे सुरेश धस यांनी सांगितले.
कृष्णा आंधळे अद्यापही फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, आतापर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपी ३०२ मध्ये आत गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणी किती मोठा असो त्यांच्यावर कारवाई करणार असे आश्वासन बीड येथे येऊन दिलेले आहे. कृष्णा आंधळे हे कोकरु फरार आहे, ते सापडेल असेही भाजपा आमदार सुरेस धस यांनी यावेळी सांगितले.