पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने विजेतेपद संपादन केले.
अतितटीच्या अंतिम फेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटीन व्हॅचेरोट विजयी
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अतितटीच्या अंतिम फेरीत मोनॅकोच्या चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टन याचा 3-6, 7-6(5), 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 2 तास 38मिनिटे चालला.
एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील चौथे विजेतेपद
व्हॅलेंटिनचे हे या वर्षातील एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील चौथे विजेतेपद आहे. याआधी त्याने २० लढतींमध्ये १९ सामन्यात विजय मिळवला असून जागतिक क्रमवारीत अव्वल १५० खेळाडूंमध्ये त्याने पहिल्यांदा प्रवेश केला आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 100एटीपी गुण व 18230डॉलर, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 50एटीपी गुण, 10730डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली.
मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल(आयएएस), केएसएलटीएचे मानद सचिव व नम्मा मेट्रो बंगळुरूचे प्रमुख महेश्वर राव(आयएएस), राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव संजय खंदारे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर(आयएएस), एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार आणि स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.
या अगोदर दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या
यावेळी एटीपी सुपरवायझर रोजेरिओ सँटोस आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.






