पुणे : हायप्रोफाईल अपघातप्रकरणानंतर प्रथमच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, ही भेट शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणात दिवसेंदिवस गंभीरता वाढू लागल्याने पवार यांनी आयुक्तांना भेटीला बोलविल्याची माहिती आहे.
मात्र, देशभरात चर्चेत असलेल्या पुणे पोर्शो कार अपघातानंतर पुण्याचे पालकमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवस ‘अलिप्त’ राहिले होते. त्यांनी पालकमंत्री म्हणून काही प्रतिक्रिया दिली नव्हती. दुसरीकडे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातानंतर पोलीस आयुक्तालयात अचानक भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांनाही यासर्व घटनेची माहिती देत याप्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. परंतु, असे असताना देखील अजित पवार मात्र बरेच दिवस अलिप्त होते. त्यामुळे तर्कवितर्क काढले जात होते.
‘वाहतुकीच्या अनुषंगाने घेतली भेट’
अपघाताला बारा दिवस उलटत असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरूवारी (दि. ३०) सकाळी सातच्या सुमारास पालकमंत्री अजित पवार यांची त्यांच्या जिजाई बंगल्यावर भेट घेतली. यावेळी पवार यांनी पोलीस आयुक्तांकडून या अपघाताची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.