वैजापूर : मराठा आरक्षणाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकणे एका प्राध्यापकाला चांगलेच भोवले. यासंदर्भात बीड येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर सुरूवातीला निलंबन व नंतर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने केली.
डॉ. सुरेश घुमटकर असे बडतर्फ प्राध्यापकाचे नाव आहे. संस्थेने जारी केलेल्या निवेदनात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रा. घुमटकर यांनी लेखी हमीपत्र देऊनही पुन्हा संस्थेची बदनामी होईल, असे कृत्य केल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरू आहेत.
येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. घुमटकर यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात 11 सप्टेंबर 2023 रोजी फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे ते चांगलेच वादात सापडले होते. त्यानंतर घुमटकर यांना मंडळाने निलंबित करून नोटीसही बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची विभागीय चौकशी केली. या चौकशीत त्यांच्यावर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
संस्थेने मांडली बाजू
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. एफ.जी. माळी यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार प्रा. सुरेश घुमटकर यांना बडतर्फ करण्यामागे त्यांचीच चूक आहे. त्यांनी २०१० पासून विविध महाविद्यालयात सेवा केलेली आहे. बीड येथे कार्यरत असताना ब्राम्हण जातीबद्दल सोशल मीडियावर हेतूपूर्वक लिखाण केले. त्यांच्या कृत्याविरोधात आदित्य कुलकर्णी आणि ब्राम्हण समाज संघटनांनी लेखी तक्रार महाविद्यालयास केली होती. या प्रकारानंतर प्रा. घुमटकर यांनी हमीपत्र देऊन यापुढे असे काही कृत्य करणार नाही, असे कळविले होते.