टोमॅटो, भाजीपाला, कांद्यासह अनेक पिकांचे भाव गडगडले; शेतकऱ्यांच्या अडचणी अद्याप थांबेना
वळती : भारत हा कृषीप्रधान देश असून, कृषी उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्र आजही लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. देशातील सुमारे ६० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामीण कुटुंबे थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत.
रोजगाराच्या दृष्टीने पाहिले असता, देशातील एकूण रोजगारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रोजगार कृषी व्यवसाय आणि कृषी संलग्न प्रक्रिया उद्योगातून निर्माण होतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तसेच समाजाच्या जीवनशैलीत शेतकऱ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या तीन दशकांपासून कृषी क्षेत्रासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहत आहेत. हवामानातील सतत होणारे बदल, अनियमित पाऊस, दुष्काळाची परिस्थिती, तसेच काही भागांमध्ये होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे उत्पादन घटते. तर कधी पिके पूर्णपणे नष्ट होतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.
याशिवाय, शेतीमालाच्या विक्रीचा प्रश्न देखील शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनला आहे. अनेकदा बाजारात शेतीमालाला योग्य दर मिळत नाहीत. कांदा, टोमॅटो, भाजीपाला यांसारख्या पिकांचे भाव अचानक घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
रासायनिक खते, कीटकनाशकांचा वाढता वापर चिंतेचा
शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि संकरित बियाण्यांचा वाढता वापर देखील चिंतेचा विषय ठरत आहे. या गोष्टींमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, उत्पादन खर्च वाढत आहे. परिणामी, शेती अधिक खर्चिक होत चालली आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासारख्या उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
सरकारकडून प्रयत्न सुरु
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी सरकार, कृषी तज्ञ आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा कृषी क्षेत्रासमोरील ही वाढती आव्हाने भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
हेदेखील वाचा : Satara News: इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा कडक इशारा






