११व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यूपी संघाचा जोरदार कमबॅकसह तेलुगु संघावर रोमहर्षक विजय
पुणे : Pro Kabaddi League 11 मध्ये आज उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर यूपी योद्धा संघाने पूर्वार्धातील सात गुणांची पिछाडी भरून काढत तेलगू टायटन्स संघावर ३६-३३असा निसटता विजय नोंदविला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला तेलुगु संघ १७-१० असा आघाडीवर होता.
सुरुवातीला तेलगू टायटन्सची आघाडी
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार विजय मलिक यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्स संघाने सुरुवातीपासूनच युपी योद्धा विरुद्ध आघाडी घेतली होती सामन्याच्या आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदविला आणि १०-४ अशी आघाडी घेतली.
यूपीच्या बचाव तंत्रात झाल्या मोठ्या चुका
यूपी संघाच्या बचाव तंत्रामधील चुकांचा फायदा तेलुगु संघाला मिळाला. तसेच त्यांचा हुकमी चढाईपटू भवानी रजपूत यालाही अपेक्षेइतके गुण घेता आले नाहीत. अर्थात यूपी संघानेही जोरदार लढत दिली पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे कमी असताना त्यांनी तेलगू संघाची आघाडी १३ विरुद्ध ९ अशी कमी करीत आणली होती. तेलगू संघाच्या खेळाडूंनी पकडी व चढाई यामधील आपले कौशल्य सातत्याने दाखवीत पूर्वार्धात १७-१० अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच यूपी योद्धाच्या खेळाडूंनी तेलुगु संघाचे आशिष नरवाल व अजित पवार या दोन्ही भरवशाच्या चढाईपटूंच्या पकडी करीत सामन्यातील उत्कंठा वाढवली. त्यातच मलिक याचीही पकड झाल्यामुळे तेलगू संघावर दडपण आले. त्यावेळी तेलगू संघाकडे जेमतेम दोन गुणांची आघाडी होती. पाठोपाठ यूपी योद्धा ने तेलगू संघावर पहिला लोण चढविला आणि सामन्यास कलाटणी दिली. त्यांनी २० विरुद्ध १७ अशी आघाडीही मिळवली.
गगन गौडाची शानदार चढायी
उत्तरार्धात पहिल्या आठ मिनिटात तेलगू संघाला एकही गुण नोंदविता आला नव्हता यावरून यूपीएस संघाने कसा सामना फिरविला याची कल्पना येऊ शकते. त्याचे श्रेय मुख्यत्वे गगन गौडा याने केलेल्या यशस्वी चढायांना द्यावे लागेल. अखेर उत्तरार्धाच्या नवव्या मिनिटाला तेलगू संघाने पहिला गुण मिळविला. सामन्याची शेवटची दहा मिनिटे कमी असताना यूपी संघाकडे २२-१८ अशी आघाडी होती. तेलुगु संघाने ही आघाडी कमी केली. शेवटची सात मिनिटे बाकी असताना गौडा याने एका चढाईत तीन गडी बाद करत संघाची आघाडी वाढवली. पाच मिनिटे बाकी असताना यूपीचा संघ २७-२१ असा आघाडीवर होता.
सामन्याची तीन मिनिटे बाकी असताना तेलुगु संघाचा खेळाडू मनजीत यांनी एका चढाईत पाच गडी बाद करीत ही आघाडी केवळ दोन गुणांपर्यंत खाली आणली. शेवटचे मिनिट बाकी असताना तेलुगु संघाने आणखी एक लोण नोंदविला. त्यामुळे सामन्यात ३१-३१ अशी बरोबरी झाली. पूर्वार्धात अपयशी ठरलेल्या रजपूतने शेवटच्या चढाईत गुण मिळवले. त्यामुळेच यूपी संघाला ३६-३३ असा रोमहर्षक विजय मिळवता आला.
त्यांच्याकडून गौडा याने १५ गुण तर रजपूत याने सहा गुण मिळविले. तेलुगु संघाकडून मलिकने सर्वाधिक ११ गुण मिळविले तर मनजितला सात गुण मिळाले. आशिष नरवाल ने चार गुणांची कमाई केली. यूपी संघाचा 15 सामन्यांमधील हा आठवा विजय आहे.