
Katraj Dairy, Pune Milk Price, Dairy Farmers, Pune News, Maharashtra Agriculture
विशेष म्हणजे दूध उत्पादकांना वाढीव दर देण्यात येणार असला तरी त्याचा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही. दूध विक्रीच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी अधिक मोबदला मिळणार असून ग्राहकांसाठी सध्याचे विक्री दर कायम राहणार आहेत.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, दुग्ध व्यवसायाचा वाढता उत्पादन खर्च आणि दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने संचालक मंडळाने दूध खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पशुखाद्य आणि वैरणीच्या दरात झालेली वाढ तसेच इंधन व वाहतूक खर्च वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दरवाढीमुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांना आर्थिक आधार मिळणार असल्याचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी सांगितले.
दूध खरेदी दरात वाढ करूनही विक्री दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा विचार करण्यात आला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देतानाच ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी संघाने विक्री दरात वाढ न करण्याची भूमिका घेतली आहे.
दूध उत्पादकांनी संघाला स्वच्छ, ताजे, भेसळविरहित आणि उच्च गुणवत्तेचे दूध पुरवावे, असे आवाहन अध्यक्ष अरुण चांभारे यांनी केले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्राहकांना दर्जेदार दूध उपलब्ध करून देतानाच दूध उत्पादकांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेण्यास संघ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.