आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर! (Credit- AI)
आरोग्य विभागाने राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अत्यावश्यक औषधे, प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सुविधा, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा, संस्थात्मक प्रसूती, शस्त्रक्रिया, बेडचा वापर, रुग्ण सुविधा आणि रुग्ण समाधान अशा विविध निकषांवर मूल्यांकन केले. त्यानुसार सोलापूर आणि पुण्याला प्रत्येकी २.२/५ स्टार, तर साताऱ्याला २.०/५ स्टार मिळाले.
पुणे जिल्ह्यात ओपीडी रुग्णसंख्या आणि रुग्ण सुविधांच्या निकषात १०० टक्के संस्थांनी अपेक्षित कामगिरी केली. रुग्ण समाधान आणि सुविधा तपासणी या दोन्ही निकषांमध्ये प्रत्येकी २२.९ टक्के संस्थांनी निकष पूर्ण केले.
कर्मचारी उपस्थितीचा निकष ५७.१ टक्के, तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेचा निकष ४६.४ टक्के संस्थांनी पूर्ण केला. शस्त्रक्रियांच्या निकषात केवळ २१.४ टक्के संस्थांना अपेक्षित कामगिरी करता आली. विशेष म्हणजे, प्रयोगशाळा व रेडिओलॉजीच्या संयुक्त निकषात एकाही संस्थेने अपेक्षित कामगिरी केली नाही. अत्यावश्यक औषधांची उपलब्धता केवळ ३.६ टक्के, तर बेड ऑक्युपन्सी १०.७ टक्के राहिली.
राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही काही मूलभूत सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याचे रेटिंगमधून स्पष्ट झाले. प्रयोगशाळा-रेडिओलॉजी आणि अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा निकष शून्य टक्के राहिला.
सोलापूरमध्ये बेड ऑक्युपन्सी १८.२ टक्के, संस्थात्मक प्रसूती २७.३ टक्के, तर शस्त्रक्रियांचा निकष ५० टक्के संस्थांनी पूर्ण केला. कर्मचारी उपस्थिती ६८.२ टक्के, रुग्ण समाधान ७७.३ टक्के, तर रुग्ण सुविधांचा निकष ९५.५ टक्के राहिला. ओपीडीच्या निकषात १०० टक्के संस्थांनी अपेक्षित कामगिरी केली.
Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
पुणे जिल्ह्यातील चाकण, जुन्नर आणि सासवड ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी तीन स्टार मिळाले. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाने ३.५ स्टार मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली. बारामती महिला रुग्णालयाला तीन, तर पुणे जिल्हा रुग्णालयाला २.५ स्टार मिळाले.
आरोग्य विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांसोबतच बाह्यस्रोतांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांचीही स्टार रेटिंगच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. अनियमितता, गुणवत्तेतील त्रुटी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्याला सरासरी २.० स्टार मिळाले असून राज्यात तो २२ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात प्रयोगशाळा व रेडिओलॉजीचा निकष शून्य टक्के, तर अत्यावश्यक औषधांची उपलब्धता केवळ ३.६ टक्के राहिली. बेड ऑक्युपन्सी आणि संस्थात्मक प्रसूतीचे निकष प्रत्येकी २६.३ टक्के संस्थांनी पूर्ण केले. शस्त्रक्रियांचा निकष ३६.४ टक्के संस्थांनी पूर्ण केला. कर्मचारी उपस्थिती आणि रुग्ण समाधानाचा स्तर ७८.९ टक्के राहिला. महाबळेश्वरला तीन स्टार, तर दहिवडी, गोंदवले आणि वडूजला प्रत्येकी २.५ स्टार मिळाले.
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेची ‘स्टार’ कामगिरी :
| निकष | कामगिरी (%) |
| ओपीडी सेवा | १००% |
| रुग्ण सुविधा | १००% |
| कर्मचारी उपस्थिती | ५७.१% |
| तज्ज्ञ डॉक्टर उपलब्धता | ४६.४% |
| रुग्ण समाधान | २२.९% |
| शस्त्रक्रिया | २१.४% |
| बेड ऑक्युपन्सी | १०.७% |
| अत्यावश्यक औषधे | ३.६% |
| प्रयोगशाळा व रेडिओलॉजी | ०% |






