पुणेकरांचा मेट्रोला मिळतोय उदंड प्रतिसाद; सुमारे 1.60 लाख नागरिक करताहेत मेट्रोने प्रवास
पुणे : पुणे मेट्रोने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर सेवा पुरवण्यासाठी एक खास योजना जाहीर केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी २०२५ रोजी ‘वन पुणे ट्रांजिट कार्ड’ अवघ्या २० रुपयांत उपलब्ध हाेत आहे. तसेच आजपासून मेट्राेची सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. आतापर्यंत रात्री दहापर्यंतच मेट्राेची सेवा उपलब्ध हाेत होती.
मेट्राेच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन्ही मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्या. यावर लोकांचा वाढता वापर आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही मर्गिकांवरील पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते रात्री १० अशी आहे. तर आता दिनांक २६ जानेवारीपासून या सेवेमध्ये एक तासाची वाढ करून ही प्रवासी सेवा रात्री ११ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोची वारंवारता गर्दीच्या वेळी (सकाळी ८ते ११ आणि संध्या. ४ ते ८) दर ७ मिनिटांनी व कमी गर्दीच्या वेळी (सकाळी ६ ते संध्याकाळी ८, सकाळी. ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते रा.१०) दर १० मिनिटांनी आहे. आता रात्री १० ते ११ या वाढलेल्या वेळेमध्ये मेट्रोची वारंवारता दर १५ मिनिटांनी असणार आहे.
तसेच मेट्राेकडून दिले जाणरे ‘ वन पुणे ट्रान्झिट कार्ड’ हे प्रजासत्ताक दिनी फक्त 20 रुपयात उपलब्ध हाेत आहे. सामान्यतः ११८ रुपयांना मिळणारे हे कार्ड प्रजासत्ताक दिनी फक्त २० रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड घेण्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची आवश्यकता भासणार नाही. प्रवाशांनी आपल्याजवळच्या पुणे मेट्रो स्टेशनवर जाऊन हे कार्ड सहज मिळवावे, असे आवाहन पुणे मेट्रोच्या प्रशासनाने केले आहे.
विशेष सवलतीचा आनंद घ्यावा
‘वन पुणे ट्रांजिट कार्ड’ वापरकर्त्यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान १० टक्के सवलत मिळत आहे, तर शनिवार आणि रविवारच्या प्रवासासाठी ३० टक्के सवलत मिळेल. पुणे मेट्रोच्या या नव्या सवलतीमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांनी २६ जानेवारी २०२५ रोजी जवळच्या मेट्रो स्टेशनवर भेट देऊन आपले ‘वन पुणे ट्रांजिट कार्ड’ मिळवावे आणि या विशेष सवलतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोने केले आहे.
सध्या पुणे मेट्रोचा वाढता वापर लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ केली आहे. रात्री कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वेळेवर पोहचणार आणि सुरक्षित असा सार्वजनिक वाहतूक पर्याय यामुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
-श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो