संग्रहित फोटो
पुणे : एखाद्या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास त्या कोंडीची जबाबदारी संबंधित वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाणार आहे. अधिकाऱ्याला कोंडीचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार असून, अहवालात वाहतूक कोंडीमागील नेमकी कारणे, ती उद्भवण्याची वेळ, तिचा कालावधी व ती सोडवण्यास केलेल्या उपाययोजनांचा तपशीही द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे, अहवाल वरिष्ठ अधिकारी पडताळतील. त्यात खोटी माहिती आढळल्यास किंवा पोलीस त्याला जबाबदारी आहेत, असे निदर्शास आल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत वेगवेगळ्या उपाययोजनाही राबविल्या जात असून, त्याचा परिणाम गेल्या काही दिवसात शहरात पाहायला मिळत आहे.
सातत्याने कोंडी झाल्यास बदली
एखाद्या विभागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असेल व त्यावर प्रभावी उपाययोजना आढळून येत नसतील, तर त्या भागातील अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात येईल. यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांवर आपल्या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे दडपण वाढणार आहे. तसेच, यामुळे अधिकाऱ्यांना आपल्या कामात अधिक सजगता आणि कार्यक्षमता दाखवावी लागणार आहे. तसेच, संबंधित कर्मचारी देखील त्याठिकाणी उपस्थित असणे गरजेचे असणार आहे. तो नसेल त्याच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे.
‘कोंडी’साठी ही कारणे मान्य होणार नाहीत
वाहतूक कोंडीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी जर खालील कारणे पुढे केली, तर ती वाहतूक पोलिसांकडून स्वीकारली जाणार नाहीत. कारण, ही कारणे टाळता येण्याजोगी असल्याचे मत वाहतूक शाखेने व्यक्त केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्याचे चालू काम, वाहनांचा जास्त प्रवाह, कार्यक्रम किंवा उत्सवामुळे, वाहन बंद पडल्याने याचा त्यात समावेश आहे.
तंत्रज्ञानाचा वापर
पुढील टप्प्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट सिग्नल यंत्रणा आणि नागरिकांच्या सूचनांचा विचारही केला जाणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे.