५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन (फोटो- ai gemini)
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. मात्र, सुट्ट्या संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी स्थानकावर गर्दी वाढली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी व्यापक गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गोरखपूर, हजरत निजामुद्दीन, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, नागपूर, कलबुर्गी आणि गाझीपूर सिटी यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुणे, हडपसर आणि खडकी स्थानकांवर तिकीट तपासणीसाठी एकूण ५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ रांगेत थांबावे लागू नये, यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर सहा, तर हडपसर स्थानकावर पाच अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. विविध स्थानकांवर एकूण १५ स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी १३ सुविधा सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुणे स्थानकावरील फलाट तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
प्रवाशांना मदत आणि माहिती मिळावी, यासाठी पुणे, मिरज, हडपसर, दौंड, अहिल्यानगर आणि खडकी स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गर्दीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र वॉर रूमही कार्यान्वित करण्यात आली आहे. महिला प्रवासी आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना आसनव्यवस्थेत प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे २२० जवान तैनात करण्यात आले आहेत.
दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांकडे लक्ष दिले जात आहे. प्रवाशांनी गाडीची माहिती आधी तपासून पुरेसा वेळ राखून स्थानकावर यावे. तसेच प्रवासादरम्यान स्थानकावरील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
– हेमंतकुमार बेहरा, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग
पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर
तपशील. प्रवासी संख्या
पुण्यात दाखल झालेले प्रवासी. ११,२३,८६४
पुण्यातून बाहेरगावी गेलेले प्रवासी. ११,१४,४१०
एकूण ये-जा करणारे प्रवासी. २२,३८,२७४
दररोजची सरासरी ये-जा. १,७२,१७६
स्थानकावरील एकूण प्रवासी संख्या. २२,३९,९६५
५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन
११ अतिरिक्त तिकीट खिडक्या
१५ स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे
५७ तिकीट तपासणी कर्मचारी
सुरक्षेसाठी २२० रेल्वे सुरक्षा दलाचे जवान
Ans: १ ते १३ नोव्हेंबर या १३ दिवसांच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरून २२ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली आहे.
Ans: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे.






