
पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
हर्षदाला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. मागील दहा-बारा वर्षांपासून ती समाजकारणात व राजकारणात सक्रीय आहे. राजकारणाची जाण, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता मला तिच्यात दिसून येते. पुरोगामी विचारांचा वारसा ती सक्षमपणे चालवेल याची मला खात्री आहे. उत्कृष्ट माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामुळे तिला समाजकारणाची ओढ लागली आहे. पदवीधरांचे प्रश्न ती विधिमंडळात प्रभावीपणे मांडेल. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हर्षदा देशमुख-जाधव ह्या आदर्श आमदार म्हणून विधानपरिषद गाजवतील याची मला खात्री आहे. जयंत आसगावकरांना आमदारकीचा अनुभव आहेच. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. सध्या देशात, राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. भाजप सरकार फक्त दिवास्वप्न दाखवत आहे जे खरं होणार नाही. आपण सर्वांनी जिद्दीने काम केलं तर आपले दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास मला आहे.
सरकारच्या विरोधी जनमत आहे – जयंत पाटील
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपने राष्ट्रवादी व शिवसेनेवर अविश्वास दाखवत जिथे त्यांचे आमदार आहेत तिथे भाजपचे निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे आपण मतदारांपर्यंत पोहचलो तर विजय आपलाच आहे. देशात बदलेल्या वातावरणाचा चांगला अंदाज या सुशिक्षित मतदारांना आहे. सरकारच्या विरोधी जनमत आहे हे सिध्द करण्यासाठी हे मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देतील याची खात्री आहे.
संपुर्ण व्यवस्थेतेवरचा विश्वास उडालेला आहे – सपकाळ
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आपला देश हा लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे गेलेला आहे. जनतेचा संपुर्ण व्यवस्थेतेवरचा विश्वास उडालेला आहे. भाजपचा सध्या सुरु असलेला पैसा फेक, तमाशा देख हा प्रकार समूळ नष्ट करायचा आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षकांना आपल्याला विचारांना योग्य दिशा देणारे नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी करुन स्वाभिमानी मतदार पैशावर विकला जात नाही हे सर्वांनी दाखवून द्यायचे आहे.
पुणे पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, पुणे हा दिशादर्शक जिल्हा आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संकल्पनेला आकार देणारा हा जिल्हा आहे. आज सर्वत्र जो जनआक्रोश दिसतोय त्याला वाचा फोडण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. आज शाहू, फुले, आंबेडकर यांची शिक्षणाची संस्कृती जोपासण्याची व पुढे नेण्याची गरज आहे. मी या निवडणुकीची तयारी मागील दीड दोन वर्षांपासून करत आहे. मी अचानक या निवडणुकीत उतरलेले नाही रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याची गरज आहे. शरद पवार यांनी भविष्याचा विचार करुन महिला व युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली त्यामुळेच आज आम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरत आहोत.