
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार (ऑनलाईन), माजी मंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बापुसाहेब पठारे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रभाकर देशमुख, अंकुश काकडे, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर पश्चिम अध्यक्ष दिप्ती चवधरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशातील व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, निवडणूक आयोग आहे, त्यावरही विश्वास नाही, एमपीएससीवर तरुणांचा विश्वास राहिलेला नाही, या यंत्रणा फेल ठरल्या आहेत तर आपला देश हुकूमशाहीकडे गेलेला आहे, या परिस्थितीतून पुढचे पाऊल कसे टाकायचे हा खरा प्रश्न आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत, या कठीण परिस्थितीत चांगले व हुशार लोकप्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजेत. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या प्रतिनिधींना सभागृहात पाठवले पाहिजेत. काँग्रेस सरकार असतानाही आरएसएसच्या लोकांची कामे केली जात असे, संघाच्या अनेक शैक्षणिक संस्थांना काँग्रेस सरकारने परवानग्या दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या २०२४ च्या घोषणापत्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मविआची सत्ता आली नसली तरीही आम्ही त्या भूमिकेवर आजही ठाम आहोत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हे सुद्धा वाचा : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, देशातील वातावरण सध्या बदलले आहे, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. राज्यात मोठा दुष्काळ पडलेला असून भाजपा सरकार दुष्काळी परिस्थिती व्यवस्थित हाताळताना दिसत नाही. २०१२-१३ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही दुष्काळ व्यवस्थित हाताळला व शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली होती. आज शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे. भाजपा सरकार विकसीत भारताचे स्वप्न दाखवत आहे पण सध्या (AI) एआयचा जमाना आहे, सरकारने कितीही जाहिरातबाजी केली तरी ते दिवास्वप्नच आहे. आपण बौद्धिक कौशल्यावरच प्रगती करू शकू आणि त्यासाठी शिक्षण संस्था सुदृढ झाल्या पाहिजेत. भाजपा सरकार विरोधात देशातील युवा पिढी व जनता रस्त्यावर आली आहे. भाजपा सरकारचे खरे स्वरुप समोर आलेले आहे पण भ्रमात राहू नका, शेवटपर्यत काम करा, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. जिद्दीने काम केले तर मविआचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.